पोलिसांनी फाडली दंडाची पावती, भडकलेल्या वीज कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यासह १२ सरकारी निवासस्थांनांचा वीजपुरवठा कापला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 12:37 PM2022-03-31T12:37:07+5:302022-03-31T12:37:38+5:30
Jara Hatke News: सरकारमधील दोन खात्यांमध्ये मतभेद होण्याच्या घटना अनेकदा घडत असतात. मग हे सरकारी बाबू आपल्या हातातील अधिकारांचा वापर करून एकमेकांना धडा शिकवण्याचाही प्रयत्न करतात.
लखनौ - सरकारमधील दोन खात्यांमध्ये मतभेद होण्याच्या घटना अनेकदा घडत असतात. मग हे सरकारी बाबू आपल्या हातातील अधिकारांचा वापर करून एकमेकांना धडा शिकवण्याचाही प्रयत्न करतात. असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील बदायूं येथे घडला आहे. हा वाद पोलीस आणि वीज कर्मचाऱ्यांमध्ये घडला आहे.
त्याचे झाले असे की, कुंवरगांवमधील वीज उपकेंद्रातील अजय कुमार हे दुचाकीवरून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जात होते. दरम्यान, वाटेत एका वळणावर पोलीस अधिकारी रामनरेश हे पथकासह वाहनांची तपासणी करत होते. त्यांनी अजय कुमारची दुचाकीसुद्धा थांबवली आणि कागदपत्रे दाखवण्यास सांगितली. मात्र कागदपत्रे अपूर्ण असल्याने तसेच सदर कर्मचाऱ्याने हॅल्मेट घातलेले नसल्याने त्यांना दंड ठोठावत पावती फाडली.
पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे सदर वीज कर्मचारी नाराज झाला. त्याने आपल्या इतर कर्मचाऱ्यांसह पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आपल्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईचा बदला घेण्यासाठी लाईनमनने पोलीस ठाण्याचा वीजपुरवठा कापला. त्यामुळे संपूर्ण पोलीस ठाणे अंधारात गेले. त्याशिवाय अवैध जोडणी असलेला इतर १२ सरकारी निवासस्थानांचा पुरवठाही खंडित केला. मात्र पोलीस इन्स्पेक्टर आणि एसडीओमध्ये झालेल्या चर्चेनंतर हा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.