Home Rent Agreement: : घरमालक केवळ 11 महिन्यांसाठी रेंट अॅग्रीमेंट का बनवतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 07:22 PM2022-08-09T19:22:08+5:302022-08-09T19:35:36+5:30
Lease Agreement Registration : रेंट अॅग्रिमेंट किंवा भाडे करार हा भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील लिखित करार आहे, ज्यामध्ये संबंधित घर, फ्लॅट, खोली, क्षेत्र इ. विहित कालावधीसाठी दिले जाते.
जर तुम्ही तुमचे घर भाड्याने दिले असेल किंवा भाड्याने घर घेतले असेल, तर तुम्ही भाडे करार (रेंट अॅग्रीमेंट) करत असाल. पण ज्या वकिलाकडून रेंट अॅग्रीमेंट केला जातो, तो केवळ 11 महिन्यांसाठीच करून दिला जातो. असे का? तर याविषयी जाणून घेऊया...
रेंट अॅग्रीमेंट काय असतो?
रेंट अॅग्रिमेंट किंवा भाडे करार हा भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील लिखित करार आहे, ज्यामध्ये संबंधित घर, फ्लॅट, खोली, क्षेत्र इ. विहित कालावधीसाठी दिले जाते. या करारामध्ये भाड्याची रक्कम, घराची स्थिती, पत्ता आणि भाडे आगाऊ समाप्त करण्यासाठी सविस्तर अटी व शर्तींचा उल्लेख असतो.
रेंट अॅग्रीमेंट 11 महिन्यांसाठी का असतो?
जरी भाडेकरू आणि घरमालक यांच्यात चांगले संबंध असले तरीही, दोन्ही पक्ष परस्पर संमतीने वर्षानुवर्षे नवीन रेंट अॅग्रीमेंट करत असले तरी, जेव्हा-जेव्हा अॅग्रीमेंट केला जातो, तेव्हा तो केवळ 11 महिन्यांसाठी असतो. कारण, रजिस्ट्रेशन अॅक्टअंतर्गत 12 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी कोणतीही मालमत्ता भाड्याने किंवा लीजवर दिली असल्यास, तो रेंट अॅग्रीमेंट किंवा भाडेपट्टी करार रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. अॅग्रीमेंट रजिस्ट्रेशनमध्ये रजिस्ट्रेशन फीसह, स्टॅम्प ड्युटी देखील आकारली जाईल. रजिस्ट्रेशन फी आणि स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी, अॅग्रीमेंट केवळ 11 महिन्यांसाठी केला जातो, जेणेकरून रजिस्ट्रेशन करण्याचे कोणतेही बंधन नाही.
रेंट अॅग्रीमेंट रजिस्ट्रेशन : स्टॅम्प ड्युटी आणि इतर शुल्क
पाच वर्षांपर्यंतच्या रेंट अॅग्रीमेंटसाठी, पाच वर्षांच्या भाड्याच्या सरासरी रकमेवर दोन टक्के दराने स्टॅम्प ड्युटी आकारली जाईल. अॅग्रीमेंटमध्ये सुरक्षा ठेव नमूद केल्यास 100 रुपये अधिक आकारले जातील. तसेच, रेंट अॅग्रीमेंट पाच वर्षांपेक्षा जास्त परंतु 10 वर्षांपेक्षा कमी असल्यास, 3 टक्के स्टॅम्प ड्युटी आकारली जाईल. 10 वर्षांपेक्षा जास्त परंतु 20 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या लीज करारांवर 6 टक्के स्टॅम्प ड्युटी लागू होईल. याशिवाय, रेंट अॅग्रीमेंट रजिस्ट्रेशनसाठी 1000 रुपये वेगळी फी आकारली जाईल.