Republic of Molossia: फक्त ३० लोक असणारा जगातील सर्वात लहान देश; जाणून घ्या कोण आहे शासक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 05:23 PM2022-07-05T17:23:26+5:302022-07-05T17:24:48+5:30
Republic of Molossia: या देशाकडे त्या सर्व गोष्टी आहेत ज्याची आपण एखाद्या राष्ट्राकडून अपेक्षा करतो. चला तर मग जाणून घेऊया सर्वांना आकर्षित करणाऱ्या या देशाबद्दल जो नेव्हाडाला आपले घर मानतो.
नवी दिल्ली | अमेरिकेतील नेव्हाडा राज्यात एक छोटेसे गाव आहे, जे 'रिपब्लिक ऑफ मोलोसिया' (Republic of Molossia) या नावाने ओळखले जाते. नेव्हाडा हे त्याच्या समृद्ध खाण इतिहासासाठी आणि पश्चिम पदचिन्हांसाठी प्रसिद्ध असलेले एक मोठे राज्य आहे. मात्र या राज्याच्या हद्दीत एक सार्वभौम देश आहे याबाबत खूपच कमी लोकांना माहिती आहे. याला मोलोसियाचे प्रजासत्ताक अर्थात मोलिसाया म्हणूनही ओळखले जाते. तसेच या देशाकडे त्या सर्व गोष्टी आहेत ज्याची आपण एखाद्या राष्ट्राकडून अपेक्षा करतो. चला तर मग जाणून घेऊया सर्वांना आकर्षित करणाऱ्या या देशाबद्दल जो नेव्हाडाला आपले घर मानतो.
नेव्हाडाच्या हद्दीत या देशाचे वास्तव्य
दरम्यान, रिपब्लिक ऑफ मोलोसिया कार्सन सिटीच्या पश्चिमेस जवळपास अवघ्या तीस मिनिटांच्या अंतरावर आहे. मोलोसियाचे प्रजासत्ताक एक माइक्रोनेशन आहे. लक्षणीय बाब म्हणजे हा खूप छोटा देश आहे. मोलोसिया देशाने २ एकरहून कमी जागा व्यापली आहे, हा देश नेव्हाडामधील डेटन येथील कार्सन नदीच्या काठावर वसलेला आहे. मोलोसियाची स्थापना १९७७ साली झाली तेव्हा याला ग्रॅंड रिपब्लिक ऑफ वल्डस्टीन असे म्हटले जात होते. जवळपास २० वर्षांनंतर १९९८ मध्ये त्याचे नाव बदलून किंगडम ऑफ मोलोसिया असे करण्यात आले होते.
साहजिकच तुम्हालाही प्रश्न पडला असेल की मोलोसियावर कुणाचे शासन असेल. केविन बॉग हा या छोट्या देशाचा राज्यकर्ता आहे, त्याने तरूण वयातच एका मित्रासोबत या राष्ट्राची स्थापना केली होती. केविनची देशभर एक निर्भीड नेता म्हणून ख्याती आहे. असा हा निर्भीड नेता अनेक कार्यक्रमांमध्ये राष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना दिसतो आणि त्याचा हा स्वभाव लोकांना खूप भावतो. सध्याच्या घडीला फ्रेंडशिप गेटवे, बॅंक ऑफ किकॅसिया आणि मोलिसियामधील सरकारी कार्यालये मोलोसिया प्रजासत्ताकमध्ये स्थित आहेत. त्यामुळे अशा अनोख्या देशाला भेट देण्यासाठी पर्यटकांचा कल अधिक पाहायला मिळतो. मात्र कोणीही अचानक या देशाला भेट देऊ शकत नाही, पर्यटकांना भेट देण्याच्या तारखा देशाच्या वेबसाइटवर पाहाव्या लागतात.
मोलोसियाची सहल करताना पर्यटकांना तेथील चलन व्हॅलोराचा (Valora) वापर करणे बंधनकारक आहे. तिथली राष्ट्रीय भाषा इंग्रजी आहे, मात्र एस्पेरांतो आणि स्पॅनिश या भाषांचा देखील तिथे वापर केला जातो.
या देशात राहतात फक्त ३० लोक
अशा स्वयंघोषित देशांना मायक्रोनेशन असे म्हणतात. या देशांना संयुक्त राष्ट्राची (UAN) तसेच अन्य कोणत्याच देशाची मान्यता नाही. यांच्याकडे आपली बॉर्डर, कायदा, बॅंकिग सिस्टम आणि सैनिक आहेत. मात्र असे असून देखील शेजारील देश त्यांना एक देश म्हणून महत्त्व देत नाही. येथे एकूण ३० लोक राहतात, तर ४ कुत्रे देखील आहेत, म्हणजेच एकूण जीवांची संख्या केवळ ३४ आहे.