जगात आधी कोंबडी आली की अंडं आलं? अखेर शास्त्रज्ञांना उत्तर मिळालं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 03:08 PM2021-12-18T15:08:00+5:302021-12-18T15:08:13+5:30
कोंबडी आधी की अंडं? असंख्य वेळा विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर सापडलंय
कोंबडी आधी की अंडं? हा प्रश्न काही आपल्यासाठी नवीन नाही. लहानपणापासून तुम्हाला कोणी तरी हा प्रश्न विचारला असेल किंवा तुम्ही तरी हा प्रश्न एखाद्याला विचारला असेल. आजही या प्रश्नाचं नेमकं आणि खरं उत्तर अनेकांना माहीत नाही. कोंबडी आधी की अंड हा प्रश्न विचारल्यावर आजही अनेकजण विचारात पडतात, डोकं खाजवतात. दोनपैकी एखादा पर्याय निवडतात. पण शास्त्रीय कारणासहित या प्रश्नाचं उत्तर देणं भल्याभल्यांना जमलेलं नाही.
कोंबडी आधी की अंडं? या प्रश्नाचं उत्तर अखेर सापडलं आहे. ब्रिटनमधल्या शेफील्ड आणि वारनिक विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी यासाठी बरंच संशोधन केलं. अखेर त्यांच्या संशोधनाला यश आलं आणि कोंबडी आधी की अंडं या प्रश्नाचं उत्तर सापडलं. त्यामागचं शास्त्रीय कारणदेखील प्राध्यापकांनी सांगितलं आहे.
जगात आधी कोंबडी आली आण मग अंडं आलं, अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे. कोंबडीशिवाय अंडं निर्माणच होऊ शकत नाही. अंड्याच्या कवचांमध्ये ओवोक्लाईडिन नावाचं प्रोटिन असतं. त्याशिवाय अंड्याचं कवच तयार होऊ शकत नाही. हे प्रोटिन केवळ कोंबडीच्या गर्भाशयातच तयार होतं. त्यामुळे जोपर्यंत कोंबडीच्या गर्भाशयातील प्रोटिनचा वापर अंड्याच्या निर्मितीसाठी वापरलं जात नाही, तोपर्यंत अंडं तयार होऊ शकत नाही. त्यामुळे जगात आधी कोंबडी आली आणि मग अंडं आलं हे स्पष्ट झालं आहे.
जगात आधी कोंबडी आली. त्यानंतर तिच्या गर्भाशयात ओवोक्लाईडिन तयार झालं. हे प्रोटिन नंतर अंड्याच्या कवचात पोहोचलं. 'जगात आधी कोंबडी आली की अंडं हा प्रश्न कोट्यवधी लोकांना पडला होता. आम्ही केलेल्या संशोधनात या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. त्यामागचं शास्त्रीय कारण शोधण्यात आम्हाला यश आलं आहे,' असं संशोधनातले प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. कॉलिन फ्रीमॅन यांनी सांगितलं.