समुद्राखाली आढळला 7000 वर्षे जुना दगडी रस्ता, पाषण युगाचे अवशेषही सापडले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 05:18 PM2023-05-11T17:18:20+5:302023-05-11T17:18:56+5:30
सध्या या ठिकाणी संशोधन सुरू आहेत, पाहा खास फोटोज.
दक्षिण क्रोएशिया देशात संशोधकांना भूमध्य समुद्राच्या 16 फूट खोल 7000 हजार वर्षे जुना दगडाने बांधलेला रस्ता सापडला आहे. या ठिकाणी पूर्वी सॉलिन नावाचे प्राचीन शहर होते. या शहरात हवार संस्कृतीचे लोक राहायचे. सॉलिन शहराचा शोध 2021 मध्ये क्रोएशियामधील झादर विद्यापीठातील पुरातत्वशास्त्रज्ञ मॅट पॅरिसा यांनी लावला होता. तेव्हापासून या ठिकाणी संशोधन सुरू आहे.
या परिसरातील कोरकुला बेटाचे काही सॅटेलाईट फोटोही घेण्यात आले होते, ज्यातून समुद्राखाली शहर असल्याचे आढळून आले. यानंतर मॅट पॅरिसा आणि त्यांच्या मित्रांनी डायव्हिंगद्वारे शहर शोधण्याचा निर्णय घेतला. भूमध्य समुद्रात 16 फूट खाली गेल्यावर त्यांना दगडी भिंती सापडल्या. या मुख्य बेटापासून विभक्त असलेल्या पातळ पृष्ठभागावर बांधलेल्या आहेत.
या ठिकाणी संशोधकांना एक पुरातन दगडी रस्ताही सापडला आहे. हा सुमारे 13 फूट रुंद रस्ता आहे. सध्या त्यावर चिखलाचा जाड थर साचला आहे. संशोधकांच्या मते पूर्वी या ठिकाणी समुद्र नव्हता. पण, कालांतराने पाण्याची पातळी वाढली. तेथे असलेल्या लाकडाचे आणि इतर वस्तूंचे रेडिओकार्बन विश्लेषण केले असता, ते सुमारे 4000 इसवी पूर्व असल्याचे आढळून आले. या ठिकाणी काही कलाकृतीही आढळली आहे.
झादर युनिव्हर्सिटीने आपल्या फेसबुक पेजवरून सांगितले की, सूमारे 7000 वर्षांपूर्वी लोक या रस्त्यावरून चालत असत. हा रस्ता शोधणे, छायाचित्रे काढणे, व्हिडीओ बनवणे यात झादर युनिव्हर्सिटी व्यतिरिक्त कॅस्टेला सिटी म्युझियम आणि कोरकुला सिटी म्युझियमच्या तज्ज्ञांचाही सहभाग होता. अनेक व्यावसायिक छायाचित्रकार आणि डायव्हर्सची मदत घ्यावी लागली. सुमारे 12 हजार वर्षांपूर्वी पाषाणयुग होते, त्या काळातील हा भाग असल्याची शक्यता आहे.