Rose Day 2023 : 'हा' गुलाब Rolls Royce च्या कारपेक्षाही महाग; किंमत जाणून बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 12:41 PM2023-02-07T12:41:54+5:302023-02-07T12:43:04+5:30
Rose Day 2023 : आज गुलाबाच्या फुलांना खूप मागणी आहे, त्यामुळे त्याची किंमत वाढली आहे.
नवी दिल्ली : आज म्हणजेच ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीकची (Valentine Week) सुरुवात झाली आहे. व्हॅलेंटाईन वीकमधील पहिला दिवस म्हणजे 'रोज डे' (Rose Day). या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना गुलाब देऊन आपल्या भावना व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन वीक असो किंवा प्रेम, गुलाबाचे स्वतःचे महत्त्व आहे. हे फूल केवळ लोकांनाच भुरळ घालत नाही, तर ते प्रेम आणि रोमान्सचे सुद्धा प्रतीक आहे. आज गुलाबाच्या फुलांना खूप मागणी आहे, त्यामुळे त्याची किंमत वाढली आहे. पण तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात महाग गुलाबाचे फूल कोणते आहे? याबद्दल जाणून घ्या...
जगभरात १६ वेगवेगळ्या रंगाचे गुलाब आहेत. प्रत्येक फुलाचे स्वत:चे वेगळे आणि विशेष महत्व आहे. यापैकी अनेक फुले सुगंध आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची लोकप्रियता इतकी आहे की जगातील सर्वात महाग गुलाबांच्या यादीत त्यांचा समावेश होतो. ज्युलिएट गुलाब जगातील सर्वात महाग गुलाब आहे. या गुलाबाच्या फुलाच्या किमतीचा अंदाज लावता येईल का? तर कदाचित नाही. कारण ज्युलिएट गुलाबाची किंमत इतकी जास्त आहे की सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील ते विकत घेऊ शकत नाही. या एका गुलाबाची किंमत १०० कोटींहून जास्त आहे.
ज्युलिएट गुलाब अतिशय सुंदर आहे. त्याचा रंग पांढरा, गुलाबी आणि पिवळा यांचे मिश्रण आहे. यातील पाकळ्यांची रचना विशिष्ट प्रकारची असते, त्यामुळे हे फूल अतिशय सुंदर दिसते. हे गुलाब फार सुवासिक असते. याचा सुगंध दूरपर्यंत दरवळतो. फायनान्स ऑनलाइनच्या रिपोर्टनुसार, ज्युलिएट गुलाबाची किंमत सुमारे १५.८ दशलक्ष डॉलर आहे म्हणजेच सुमारे १२८ कोटी आहे. हे फुलण्यासाठी किमान १५ वर्षे लागतात, त्यामुळेच या गुलाबाची किंमत इतकी जास्त आहे. या गुलाबाला जर्दाळू रंगाचा संकर म्हणतात. २००६ मध्ये जेव्हा हे फूल पहिल्यांदा फुलले तेव्हा त्याची किंमत सुमारे ९० कोटी रुपये होती.
या व्यक्तीने तयार केलं ज्युलिएट गुलाब
डेव्हिड ऑस्टिन यांनी या गुलाबाचा शोध लावला होता. त्यांनी अनेक प्रकारच्या गुलाब एकत्रित करून हे संकरीत प्रजातीचे गुलाब तयार केले. डेव्हिड ऑस्टिनच्या वेबसाइटनुसार, या खास गुलाबाचा सुगंध हलका चहाच्या सुगंधासारखा आणि अत्तराच्या सुगंधासारखा आहे. डेव्हिड ऑस्टिन यांनी सांगितले की, ज्युलिएट गुलाबाची किंमत इतकी जास्त आहे, कारण त्याचे रोप वाढवण्यासाठी आणि गुलाब फुलण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.