...त्याचा वेलू गेला गगनावरी, गावठी गुलाबाचा विस्तार झाला तब्बल ३० फुटांपर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 01:40 AM2018-08-12T01:40:24+5:302018-08-12T01:41:33+5:30
गुलाबाचे झाडे वाढून वाढून वाढणार किती काही फुटापर्यंत. असा आपला नेहमीचा विचार. या तुमच्या ज्ञानाला अपवाद निर्माण करणारे गुलाबाचे झाड वाढले तब्बल ३० फुटापर्यंत. हा अजब प्रकार घडला आहे. विश्वास बसत नाही ना?
बिबवेवाडी : गुलाबाचे झाडे वाढून वाढून वाढणार किती काही फुटापर्यंत. असा आपला नेहमीचा विचार. या तुमच्या ज्ञानाला अपवाद निर्माण करणारे गुलाबाचे झाड वाढले तब्बल ३० फुटापर्यंत. हा अजब प्रकार घडला आहे. विश्वास बसत नाही ना?
बिबवेवाडी पोलीस चौकीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब भारूड यांनी आवड म्हणून गावठी गुलाबाचे रोप त्यांच्या सुखसागरनगर येथील कल्पवृक्ष या राहत्या घरी ४ ते ५ वर्षांपूर्वी लावले होते. परंतु बघता बघता या गावठी गुलाबाच्या रोपाचे ३० फुटी झाडांत रूपांतर झाले.
नानासाहेब भारूड हे मूळचे कोपरगाव येथील शेतकरी कुटुंबातील त्यामुळे त्यांना शेतीची व झाडांची आवड असून, पोलीस खात्यातील नोकरी करत असतानाही त्यांनी आपली आवड जपली. या गुलाबाच्या झाडासाठी त्यांनी संपूर्णपणे सेंद्रिय खताचा वापर केला असून, हे सेंद्रिय खतसुद्धा स्वयंपाक घरातील ओल्या कचऱ्यापासून तयार करतात. या सेंद्रिय खतामुळेच या गुलाबाच्या झाडाची वाढ झाली असे भारूड यांनी सांगितले. या गावठी गुलाबाच्या झाडाला १२ महिने हलक्या गुलाबी रंगाचे ताटवे फुलले असतात. फुले नेहमी झाडावरच चांगली दिसतात या विश्वासातून या झाडाचे फुले ते कधीही तोडत नाहीत. त्यामुळे या परिसरात या ३० फुटी गुलाबाच्या झाडाची परिसरात आकर्षण व चर्चा असते.