४ कोटींची कार खरेदी करण्यासाठी १ वर्ष वाट पाहिली, केवळ ६ तासांत झाला चेंदामेंदा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 11:28 AM2021-03-26T11:28:20+5:302021-03-26T11:32:30+5:30
एका व्यक्तीने फरारी कार बुक केली होती. पण ही कार मिळण्यासाठी त्याला काही महिने वाट बघावी लागणार होती. तरी फरारी F8 Tributo खरेदी करण्यासाठी कित्येक महिने त्याने वाट पाहिली.
आपली स्वत:ची कार घेणं हा प्रत्येकासाठीच आनंदाचा क्षण असतो. अनेकजण आपली स्वत:ची कार घेण्यासाठी अनेकवर्षे वाट बघतात. कार आली की, त्या प्रवास करण्याचा आनंद काही औरच. मात्र, एका व्यक्तीसोबत फारच विचित्र घटना घडली आहे. कारची डिलिव्हरी झाल्यावर केवळ ६ तासांमध्ये त्याची कोट्यावधी रूपयांची कार चेंदामेंदा झाली.
एका व्यक्तीने फरारी कार बुक केली होती. पण ही कार मिळण्यासाठी त्याला काही महिने वाट बघावी लागणार होती. तरी फरारी F8 Tributo खरेदी करण्यासाठी कित्येक महिने त्याने वाट पाहिली. मात्र, इतके महिने प्रतिक्षा केल्यावर मिळालेला आनंद केवळ ६ तासच टिकू शकला. ४३ वर्षीय व्यक्तीने ४ कोटी रूपयांची फरारी F8 Tributo घेतल्यावर काही वेळातच ठोकली. कारची हालत इतकी खराब आहे की, या इटालियन कारचा फ्रंट लूक पूर्णपणे खराब झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी चौकशीत सांगितलं की, फरारी एका काँक्रिट बॅरियरवर आदळली आणि मागचं चाक पूर्णपणे मागे गेल्याने कारने पलटी खाल्ली. नंतर गाडी एका छोट्या बसलाही धडकली, त्यामुळे आणखी नुकसान झालं. गाडीचं सस्पेंशन, फ्रंट क्वॉर्टर पॅनलही पूर्णपणे बेंड झालं आहे. सुदैवाने या अपघातात चालकाला फार दुखापत झालेली नाही, परंतु मागच्या सीटवर बसलेला व्यक्ती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, Ferrari F8 Tributo मध्ये ३.९ लिटर ट्विन टर्बो V8 इंजिन देण्यात आलं आहे, जे ७१० हॉर्सपॉवरचं आहे. यात ३.९ लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन मिळतं, जे ७३०PS पॉवर आणि ७७० Nm चा टॉर्क जेनरेट करतं. Ferrari F8 Tributo कार केवळ २.९ सेकंदात ० ते १०० किलोमीटर ताशी वेग धरु शकते आणि ७.८ सेकंदात ही २०० किलोमीटर ताशी वेगाने धावते. या कारचा टॉप-स्पीड ३४० किलोमीटर प्रति तास आहे.