RTI दाखल करून मागितला श्रीकृष्ण देव असल्याचा पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 08:44 AM2018-10-03T08:44:18+5:302018-10-03T08:45:07+5:30
माहितीच्या अधिकारामुळे सरकारी कारभारात पारदर्शकता येऊन सर्वसामान्यांच्या महत्त्वाची माहिती मिळणे सोपे झाले असले तरी त्याचा दुरुपयोग करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे.
मथुरा - माहितीच्या अधिकारामुळे सरकारी कारभारात पारदर्शकता येऊन सर्वसामान्यांच्या महत्त्वाची माहिती मिळणे सोपे झाले असले तरी त्याचा दुरुपयोग करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. असाच प्रकार मथुरा येथे समोर आला आहे. छत्तीसगडमधील एका आरटीआय कार्यकर्त्याने मथुरा येथील जिल्हा प्रशासनाकडे आरटीआय दाखल करून भगवान श्रीकृष्णाचा जन्म, त्याचा गाव, त्याने केलेले चमत्कार आणि त्याच्या देव असण्याबाबतची माहिती आणि पुरावे देण्याची मागणी केली आहे.
अशा प्रकारच्या आरटीआयमुळे जिल्हा प्रशासन गोंधळून गेले आहे. या आरटीआयला नेमके काय उत्तर द्यावे, हा प्रश्न त्यांना पडला आहे. छत्तीसगड येथील आरटीआय कार्यकर्ते जैनेंद्र कुमार गेंदले यांनी मथुरा जिल्हा प्रशासनाला आरटीआयच्या माध्यमातून तीन प्रश्न विचारले आहेत. 3 सप्टेंबर रोजी कृष्ण जन्माष्टमीनिमित्त देशभरात सुट्टी दिली गेली होती. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या जन्म प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत उपलब्ध करून द्यावी जेणेकरून श्रीकृष्णाचा जन्म त्याच तारखेला झाला हे सिद्ध होईल. तसेच ते खरेच देव होते का? असतील तर ते कोणत्या प्रकारचे देव होते. याबाबत पुरावाही देण्यात यावा, अशी मागणी या आरटीआयमधून करण्यात आली आहे. तसेच श्रीकृष्णाचा गाव कोणता होता? त्यांनी आपल्या जीवनकाळात कोणकोणते चमत्कार केले? यांचीही माहिती देण्याचे मागणी गेंदले यांनी केली आहे.
दरम्यान, या विचित्र आरटीआयबाबत एडीएम (कायदा आणि सुव्यवस्था) रमेशचंद्र यांनी सांगितले की, हिंदू धर्माशी संबंधित तमाम ग्रंथ, पुस्तके आणि इतर साहित्यामध्ये श्रीकृष्णाबाबत वर्णन केलेले आहे. आता धार्मिक आस्थेशी संबंधित असलेल्या अशा प्रश्नांना काय उत्तर द्यायचे याबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.