Russian Hulk: रशियन 'बाहुबली'चा विश्वविक्रमी कारनामा; एकावेळी ओढले 15.6 टन वजनाचे 3 हेलिकॉप्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 07:15 PM2022-05-20T19:15:56+5:302022-05-20T19:16:22+5:30
Russian Hulk pulls 3 choppers: 'रशियन हल्क' नावाने प्रसिद्ध असलेल्या सर्गेई अगडजानयानने 19 मे रोजी 3 हेलिकॉप्टर ओढण्याचा विश्व विक्रम केला आहे. पहा या विक्रमाचा Video
Russian Hulk pulls 3 choppers: दोरीच्या सहाय्याने अनेक टन वजनी उपकरण ओढण्याचा विश्व विक्रम करणाऱ्या सर्गेई अगडजानयान उर्फ Russian Hulk ने आपल्या नावे अजून एक नवीन विक्रम केला आहे. सर्गेईने एकाचवेळी तीन हेलिकॉप्टर ओढण्याचा नवीन जागतिक विक्रम केला आहे. सर्गेई अगडजानयानच्या यूट्यूबवर अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. यात तो अनेक धोकादायक कारनामे करताना दिसतो.
एकसोबत ओढले तीन हेलिकॉप्टर
सर्गेईचा हा कारनामा पाहून तिथे उपस्थित लोक चकीत झाले. त्याच्या या विक्रमी कारनाम्याचा व्हिडिओही व्हायरल होतोय. विशेष म्हणजे, Russian Hulk ने हेलिकॉप्टर ओढत असताना एक मेडिकल हीटिंग पॅड (गरम पाण्याची पिशवी) आपल्या तोंडाने हवा भरुन फुगवली. एकाचवेळी हेलिकॉप्टर ओढणे आणि गरम पाण्याची पिशवी फुगवणे पाहून तिथे उपस्थित सर्वजण आश्चर्यचकीत झाले होते.
पहा Video:-
हेलिकॉप्टरचे एकूण वजन 15.6 टन
दोन अंसॅट हेलिकॉप्टर आणि एक एमआय-8 हेलिकॉप्टरचे एकूण वजन 15.6 टन होते. सर्गेईने अवघ्या 24.63 सेकंदात हे तिन्ही हेलिकॉप्टर 4.3 मीटर अंतरापर्यंत ओढले. पावसामुळे रस्ता ओलसर झाला होता, अशा परिस्थितीत हेलिकॉप्टर ओढण्यासाठी सर्गेईला तीन प्रयत्न करावे लागले. पहिले दोन प्रयत्न अपयशी ठरले, पण तिसऱ्या प्रयत्नात Russian Hulk ने विश्व विक्रम केला. हा रेकॉर्ड आतापर्यंत रशियाच्या फेडरेशन ऑफ पॉवर एक्सट्रीमचे अध्यक्ष वासिली ग्रिशचेंकोच्या नावे होता.