सचिनचा आदर्श स्ट्रोक, दत्तक घेतलेल्या गावाचे केले मेकओव्हर
By admin | Published: April 12, 2015 03:38 PM2015-04-12T15:38:01+5:302015-04-12T15:38:01+5:30
खासदार सचिन तेंडुलकरने चार महिन्यांपूर्वी पुत्तमराजू कंद्रिगा हे गाव दत्तक घेतले व अवघ्या चार महिन्यात या गावाने कात टाकत विकासाची वाट धरली आहे.
ऑनलाइन लोकमत
पुत्तमराजू कंद्रिगा (आंध्रप्रदेश), दि. 12 - आंध्रप्रदेशमधील पुत्तमराजू कंद्रिगा गाव... अवघी 400 लोकसंख्या असलेल्या या गावात पाणी नव्हते, स्वच्छतागृहांची वानवा होती.. मात्र.खासदार सचिन तेंडुलकरने चार महिन्यांपूर्वी हे गाव दत्तक घेतले व अवघ्या चार महिन्यात या गावाने कात टाकत विकासाची वाट धरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी आदर्श ग्राम योजना जाहीर केली होती. यामध्ये प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा विकास करणे आवश्यक होते. खासदारांनी गाजावाजा करत गाव दत्तक घेतले असून या गावांसाठी लाखो रुपयांच्या योजनाही आखण्यात आल्या. मात्र अद्याप या विकास कामांची सुरुवात झालेली नाही. क्रिकेटनंतर संसदेत खासदारकीची इनिंग सुरु करणारा सचिन तेंडुलकर याला अपवाद ठरला आहे. सचिनने दत्तक घेतलेल्या पुत्तमराजू कंद्रिगा या गावात अवघ्या चार महिन्यांमध्येच विकासाची गंगा वाहू लागली आहे.
सचिन तेंडुलकरने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने गावात सुमारे 2.79 कोटी रुपयांचा खासदार निधी खर्च केला. यातून गावात 24 तास पाणी व वीज पुरवठा देण्याचे काम सुरु झाले आहे. याशिवाय गावात सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटार व सांडपाणी प्रक्रीया केंद्र बांधण्याचे कामही वेगात सुरु आहे. गावात सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधले जात आहेत. अवघ्या चार महिन्यात या गावाचे रुप बदलत असून गावात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक सार्वजनिक सभागृहदेखील बांधले जात आहे. चार महिन्यांपूर्वी आमच्या गावात कोणत्याही सोयी सुविधा नव्हत्या. पण सचिन तेंडुलकर यांनी आमचे गाव दत्तक घेताच गावाचा चेहरामोहराच बदलत आहे असे भास्कर राव या ग्रामस्थाने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.
गावात 110 घरं असून गावाची लोकसंख्या 399 एवढी आहे. लिंबू व मिरचीची शेती हे या गावातील उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. सध्या गावातील प्रत्येक जण सचिनचे आभार मानत आहे. सचिनच्या हा आदर्श खेळीचे अन्य खासदार कधी अनुकरण करतील हा मोठा प्रश्न आहे.