देशात होतेय पायरेटेड पेंटिंग्जची विक्री
By admin | Published: July 6, 2015 03:43 AM2015-07-06T03:43:51+5:302015-07-06T03:43:51+5:30
सुप्रसिद्ध चित्रकारांनी रेखाटलेल्या दुर्मीळ चित्रांची हुबेहुब नक्कल करून त्याद्वारे कलाप्रेमींना लाखोंचा गंडा घातला जात असल्याचे समोर आले आहे.
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
एम.एफ. हुसेन, मुजुमदार, एस.एच. रझा अशा अनेक हयात नसलेल्या व असलेल्या सुप्रसिद्ध चित्रकारांनी रेखाटलेल्या दुर्मीळ चित्रांची हुबेहुब नक्कल करून त्याद्वारे कलाप्रेमींना लाखोंचा गंडा घातला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशाच प्रकरणात फसवणूक झालेल्या प्रेमसिंग सावित्री यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यावरून देशभरात अशा नकली चित्रविक्रीचे मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, फसवणूक करणारी व्यक्ती इंदोरची असून त्या ठिकाणी अशा नकली चित्रांचा मोठा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
मोठ्या कलावंतांची पेंटिंग्ज घराच्या भिंतीवर लावणे हे एक श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. अलीकडच्या काळात ही फॅशन अधिक वाढले आहे. त्याचाच फायदा घेत नावाजलेल्या चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांच्या पायरेटेड प्रती तयार करून त्याची विक्री करण्याचा गोरखधंदा सध्या तेजीत आला आहे. कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. प्रेमसिंग सावित्री यांनी ही तक्रार केली असून त्यांची ४० लाखांची फसवणूक झाली आहे. त्यांचे परिचित राजा मुदलियार यांना एम. एफ. हुसेन, एस. एच. रझा अशा प्रसिद्ध कलावंतांची पेंटिंग हवी होती. याची माहिती प्रेमसिंग यांनी चित्रांचा व्यापार करणाऱ्या बलवंतसिंग ठाकूर यांना दिली होती. यावेळी रझा यांनी काढलेले दोन कोटी रुपये किमतीचे पेंटिंग आपल्याकडे असून ते ४० लाख रुपयांमध्ये देतो, असे ठाकूर याने त्यांना सांगितलेले. हे चित्र आवडल्याने त्यांनी ते खरेदी केल्यानंतर ठाकूर याने ते खरे असल्याचे प्रमाणपत्रही दिलेले. मात्र काही दिवसांनी त्यांनी ते चित्र दुसऱ्या व्यक्तीला विकले. त्यांनी केलेल्या पडताळणीत ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. मध्यस्थी असल्याने हे प्रकरण प्रेमसिंग यांच्या अंगाशी आल्याने त्यांनी इंदोर येथे जाऊन बलवंतसिंग ठाकूर यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी एम. एफ. हुसेन, मजुमदार, एस. एच. रझा अशा अनेक हयात नसलेल्या व असलेल्या कलावंतांच्या पेंटिंगच्या प्रती दिसल्याचे व पहिल्या बनावट चित्राच्या बदल्यात त्याने दिलेले दुसरे चित्र देखील बनावट निघाल्याचेही प्रेमसिंग यांनी सांगितले. त्यानुसार यासंबंधीची तक्रार त्यांनी कोपरखैरणे पोलिसांकडे केली आहे.
--------------
एखाद्या कलाकाराच्या चित्राचे नकली चित्र करून ते विकणे निषेधार्ह असून, ते पूर्वीपासून चालत आले आहे. चित्रांचे महत्त्व वाढल्याने होत असलेला कलाक्षेत्रातला हा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे असे नकली चित्र बनवणाऱ्या चित्रकारांनी नैतिकता पाळावी.- सुहास बहुळकर, प्रसिद्ध चित्रकार