आठवड्यात फक्त 20 तास काम करते 'ही' मुलगी अन् महिन्याला कमवते 8 लाख!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 11:43 PM2022-12-15T23:43:33+5:302022-12-15T23:43:59+5:30
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, या मुलीचे नाव मॅडी कोलमॅन आहे. ती अमेरिकेतील जॉर्जिया येथील रहिवासी आहे.
सोशल मीडिया व्हिडिओ बनवण्यासाठी एका मुलीने कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला. आता ती व्हिडिओ बनवून दरमहा लाखो रुपये कमवते. आठवड्यातून 20 तास व्हिडिओ कंटेंटवर काम करून महिन्याला जवळपास 8 लाख रुपये कमावल्याचे मुलीने सांगितले आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, या मुलीचे नाव मॅडी कोलमॅन आहे. ती अमेरिकेतील जॉर्जिया येथील रहिवासी आहे. मॅडी कोलमॅनने सांगितले की, कंटेंट क्रिएटर्सला प्रोडक्टशी संबंधित व्हिडिओ बनवण्यासाठी ब्रँड्स पैसे देतात, जेणेकरून ब्रँड्स हे व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे शेअर करू शकतील किंवा जाहिरातींमध्ये वापरू शकतील.
मॅडी कोलमॅनने पुढे सांगितले की, हे इंफ्लूएंसिंगपेक्षा वेगळे आहे. कारण येथे ब्रँड्स तुम्हाला तुमच्या इंफ्लूएंससाठी पैसे देत नाहीत. ब्रँड्सना फक्त तुमच्या स्किल्सची गरज असते, जी चांगली गोष्ट आहे. कारण या फिल्डमध्ये स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला फॉलोअर्सची गरज नाही. दरम्यान, मॅडी कोलमॅनने 8 महिन्यांपूर्वी कंटेंट क्रिएटरचे काम सुरू केले होते. तिने काही काळ कंटेंट क्रिएशनबद्दल अभ्यास केला आणि नंतर व्हिडिओ कंटेंटचा पोर्टफोलिओ बनवल्याने तिला काम सुरू करण्यास मदत झाली. त्यानंतर मॅडी कोलमॅनने चार्ज स्ट्रक्चर तयार केले आणि ट्विटर आणि टिकटॉकवर स्वतःचे मार्केटिंग सुरू केले.
3 आठवड्यांनंतर मॅडी कोलमॅनला तिचा पहिला क्लायंट मिळाला आणि ती तिथून पुढे गेली. दरम्यान, टिकटॉकवरील लोकांना मॅडी कोलमॅनकडून तिच्या कामाबद्दल जाणून घ्यायचे होते, त्यानंतर मॅडी कोलमॅनने एक व्हिडिओ शेअर केला. मॅडी कोलमॅनने सांगितले की, सुरुवातीच्या काळात तिने अनुभव आणि पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी कमी-बजेट आणि विनामूल्य सहकार्यावरही काम केले. तसेच, मॅडी कोलमॅनने दावा केला आहे की, तिने पूर्णवेळ कंटेंट तयार करून पहिल्या महिन्यात सुमारे 4 लाख रुपये कमावले आहेत.
मॅडी कोलमॅनने काम सुरू केल्यानंतर काही महिन्यांनी तिने आणि तिच्या जोडीदाराने कॉलेज सोडले. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ व्हिडिओ कंटेंटवर काम करण्यास सुरूवात केली. दरम्यान, 15 ते 30 सेकंदांच्या पोस्टसाठी सुमारे 21 हजार रुपये घेते, असे मॅडीने सांगितले. तसेच, ती एका महिन्यात सुमारे 30 व्हिडिओ बनवते. मॅडी स्वत:ला इंफ्लूएंसर म्हणवत नसली तरी टिकटॉकवर तिचा चाहतावर्ग वाढतच आहे. येथे तिचे जवळपास 30 हजार फॉलोअर्स आहेत. तसेच तिच्या प्रत्येक व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळतात.