बाबो! शास्त्रज्ञ बनला शेळी अन् गवतही खाऊ लागला; कारण ऐकलं तर हैराण व्हाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 09:49 AM2022-12-05T09:49:22+5:302022-12-05T09:49:34+5:30

बकऱ्यांच्या कळपात राहायला सुरुवात केली. त्यासाठी आल्प्स पर्वतरांगांतील डोंगरातही ते गेले.

Science behind the man who turned himself into a goat | बाबो! शास्त्रज्ञ बनला शेळी अन् गवतही खाऊ लागला; कारण ऐकलं तर हैराण व्हाल 

बाबो! शास्त्रज्ञ बनला शेळी अन् गवतही खाऊ लागला; कारण ऐकलं तर हैराण व्हाल 

googlenewsNext

शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा.. असं म्हटलं जातं. खरंच आहे ते. पण एखाद्याला खरंच शेळी म्हणून जगायचं असेल तर? असाही एक माणूस आहे, ज्यानं शेळी व्हायचं ठरवलं आणि तो खरोखर शेळी झालासुद्धा! - का? कसा? कशासाठी?... त्याचीही एक मोठी कहाणी आहे. 

ब्रिटिश संशोधक आणि लेखक थॉमस थ्वेट आपल्या संशोधनासाठी, लेखनासाठी जसे प्रसिद्ध आहेत, तसेच एक संवेदनशील माणूस म्हणूनही त्यांची मोठी ख्याती आहे. याशिवाय ते एक उत्कृष्ट डिझायनर आहेत, विज्ञान-तंत्रज्ञानात त्यांना प्रचंड रुची आहे. फ्यूचर्स रिसर्चमध्ये त्यांचा हातखंडा आहे. असा हा माणूस. अतिशय कलासक्त, आपल्या कामावर प्रचंड प्रेम असलेला आणि तरीही भावनाशील. 
थॉमसच्या पुतणीनं एक कुत्रा पाळलेला आहे. या कुत्र्याची देखभाल करण्याची, त्याला सांभाळण्याची जबाबदारी तिनं एकदा आपल्या काकाला सांगितली. थॉमस आपल्या परीनं कुत्र्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करीत होते. हे काम आपल्याला जमेल की नाही, अशी चिंता त्यांना वाटत होती. कुत्र्याला जर नीट सांभाळलं नाही, तर आपल्या पुतणीला वाईट वाटेल, यामुळेही ते थोडे चिंतीत होते. याच विचारानं ते काहीसे नर्व्हस, उदास झाले होते. कुत्र्याला मात्र त्याचं काहीही देणंघेणं नव्हतं. तो आपल्याच मस्तीत गुंग होता. त्याला ना कसली चिंता होती, ना कसली काळजी. तो अतिशय खूश होता. थॉमस यांच्या मनात विचार आला, हा कुत्रा किती भाग्यवान आहे! आपण जर या कुत्र्याच्या जागी असतो, तर काय बहार आली असती! ना कुठली टेन्शन्स, ना चिंता, ना काळजी. आला दिवस मस्त जगायचा, भविष्याची काळजी करायची नाही आणि दुसऱ्यांच्या डोक्यातही काळजीचे भुंगे पेरायचे नाहीत! 

कुत्र्याची काळजी घेताना थॉमस थेट आपल्या बालपणात गेले. त्यांना आपले शाळेचे दिवस आठवले. ते जेव्हा शाळेत जायचे, तेव्हा अतिशय कडाक्याची थंडी असायची. या कुडकुडत्या थंडीत शाळेत जायचा त्यांना खूप कंटाळा यायचा. त्यावेळी त्यांना वाटायचं, आपण मांजर असतो, तर किती बरं झालं असतं. इतक्या बोचऱ्या थंडीत आपल्याला शाळेत जावं लागलं नसतं. मस्तपैकी एखाद्या उबदार ठिकाणी गुरगुटून झोपता आलं असतं! 

पुढच्याच क्षणी थॉमस यांच्या डोक्यात विचार आला, खरंच किती सुखी असतात प्राणी! कुठल्याही कौटुंबिक जबाबदाऱ्या नाहीत की व्यावसायिक झेंगट नाहीत, टार्गेटच्या मागे धावायचं नाही, कुठली बिलं भरायची नाहीत, घराच्या हप्त्यांसाठी जीव काढायचा नाही, नोकरी जाईल की राहील, प्रमोशन कधी होईल, पगारवाढ होईल की नाही, वशिलेबाजी, आपल्याच ज्युनिअरला आपल्या डोक्यावर आणून बसवणं.. कुठली म्हणजे कुठलीच टेन्शन्स नाहीत! खरंच आपण एखादा प्राणीच होऊयात! 

थॉमस यांनी पहिल्यांदा विचार केला तो हत्ती होण्याचा! त्यासाठी ते जंगलात गेले, प्राणीसंग्रहालये पालथी घातली. तिथे हत्तींचं जवळून निरीक्षण केलं. पण त्यांच्या लक्षात आलं, हत्ती हादेखील अतिशय भावनाशील प्राणी आहे. त्यांच्या कुटुंबात कोणी आजारी पडलं, त्याचा मृत्यू झाला, तर ते अतिशय टेन्शनमध्ये येतात. त्यामुळे त्यांनी शेळी बनण्याचा निर्णय घेतला!  हा निर्णय डोक्यात आल्याबरोबर थॉमस यांनी त्याची सारी तयारी केली. अभ्यास केला. एवढंच नाही, ‘प्रॉस्थेटिक लिम्ब्स’ (कृत्रिम अवयव) तयार केले. आपल्या हातांनाच पुढचे दोन पाय जोडले, चारही पायांना खूर लावले आणि चक्क बकरीसारखं चार पायांवर त्यांनी चालायला सुरुवात केली! बकऱ्यांच्या कळपात राहायला सुरुवात केली. त्यासाठी आल्प्स पर्वतरांगांतील डोंगरातही ते गेले.

बकऱ्यांसोबत चार पायांवर फिरताना, त्यांच्यासारखंच राहताना बकऱ्यांनाही ते त्यांच्यातलेच एक वाटायला लागले. खरीखुरी बकरी बनायचं, तर आणखी काय करता येईल?- त्यांनी मग बकऱ्यांसारखं चक्क गवतही खायला सुरुवात केली! थॉमस म्हणतात, बकरी बनल्यावर खरोखर मला खूप मन:शांती मिळाली. माझ्या सगळ्या चिंता आणि विवंचना यापासून काही काळ मी दूर गेलो. निसर्गाच्या आणि बकऱ्यांच्या सानिध्यात मला एका अतिव शांततेची अनुभूती आली.

गवत खाऊनच जगायचं होतं, पण..
युनिव्हर्सिटी ऑफ सॅलफोर्डच्या ‘प्रॉस्थेटिक क्लिनिक’मधील डॉक्टरांनी थॉमस यांना त्यांचे कृत्रिम पाय आणि खूर तयार करून दिले. शेळी बनल्याच्या काळात त्यांना घास आणि गवत खाऊनच जगायचं होतं. त्यासाठी कृत्रिम पोटही त्यांना तयार करायचं होतं, पण यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिल्यानंतर त्यांनी तो विचार सोडला. स्वत:ला शेळीत रूपांतर करून घेतल्यानंतर ते आता पुन्हा ‘मानवी रूपात’ आले आहेत; पण त्यांचं म्हणणं आहे, मी पुन्हा केव्हाही शेळी बनू शकतो!

Web Title: Science behind the man who turned himself into a goat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.