'या' ठिकाणी पडली जगातील सर्वात मोठी उल्का, आजपर्यंत कुणाला एक इंचही हलवता आली नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 05:54 PM2022-01-09T17:54:30+5:302022-01-09T17:54:45+5:30
1920 मध्ये जेकोबस हर्मनस ब्रिट्स नावाचा शेतकरी त्याच्या शेतात नांगरणी करत असताना अचानक त्याचे नांगर अडकले. त्याने जमीन खोदली तेव्हा त्याला 60 टन वजनाची उल्का दिसली. त्या उल्काला 'होबा वेस्ट उल्का' असे नाव देण्यात आले.
पृथ्वीवर कोट्यवधी वर्षांपूर्वी उल्कापिंड पडून डायनासोरचा अंत झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत अनेकदा पृथ्वीवर उल्का पडल्या आहेत. त्यातील काहींनी खूप नुकसान केले, तर काही हवेतच निष्ट झाल्या. पण, नामिबिया देशातील होबा वेस्ट उल्का ही पृथ्वीवर आढळणारी सर्वात मोठी मोनोलिथिक उल्का आहे. या उल्काचे वजन 60 टन असून ही उल्का 84% लोहाची बनलेली आहे. ही पृथ्वीवरील सर्वात मोठी नैसर्गिक लोह वस्तूदेखील आहे.
शेतात आढळली उल्का
होबा उल्कापिंडाचे नाव होबा वेस्टच्या नावावरुन पडले आहे. याच ठिकाणी या उल्कापिंडाचा शोध लागला. ही उल्का 1920 मध्ये एका शेतकऱ्याने पहिल्यांदा पाहिली होती. जेकोबस हर्मनस ब्रिट्स नावाचा शेतकरी त्याच्या शेतात नांगरणी करत असताना अचानक त्याचा नांगर अडकला. त्याने जमीन खोदली तेव्हा हा मोठा दगड बाहेर आला. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही उल्का सापडली, त्या ठिकाणावरुन आजपर्यंत एकदाही ही उल्का हलली नाही.
80 हजार वर्षे जुनी होबा वेस्ट
ही उल्का सापडल्यानंत तेथे उत्खनन करण्यात आले आणि ते उल्कापिंड सर्वांना दिसले. या उल्कापिडांने जगभरातील अनेक शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले. असे मानले जाते की होबा उल्का सुमारे 80,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर पडली होती. Geology.com च्या मते पृथ्वीवर येत असताना या उल्काचा वेग कमी असल्यामुळे उल्का हवेत नष्ट झाली नाही आणि जमिनीतही जास्त खोलर गेली नाही.
1987 मध्ये बांधले पर्यटन केंद्र
या उल्काचे संरक्षण करण्यासाठी होबा उल्काला 1955 मध्ये नामिबियाचे राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात आले. 23 वर्षांनंतर शेताच्या मालकाने उल्कापिंड आणि ते जिथे आहे ती जागा शैक्षणिक हेतूंसाठी राज्याला दान केली. त्यानंतर 1987 मध्ये या ठिकाणी पर्यटन केंद्र सुरू करण्यात आले आणि आजपर्यंत हजारो लोक या ठिकाणी दरवर्षी भेट देतात.