शास्त्रज्ञांनी उलगडले 4500 वर्षे जुन्या 'स्फिंक्स'चे गूढ, अशा प्रकारे बांधली गेली महाकाय मूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 08:23 PM2023-11-05T20:23:55+5:302023-11-05T20:24:37+5:30
इजिप्तच्या 4500 वर्षे जुन्या स्फिंक्स मूर्तीबाबत अनेक दावे केले जातात.
प्राचीन इजिप्तची अनेक रहस्ये आजही जगासाठी रहस्य बनून राहिली आहेत. यात गिझाच्या ग्रेट पिरॅमिडचाही समावेश आहे. हा पिरॅमिड कसा बांधला गेला, अवाढव्य दगड यंत्राशिवाय एकावर-एक कसे ठेवले गेले, या सर्व गोष्टी आजपर्यंत एक गूढच राहिल्या होत्या. याशिवाय, 4,500 वर्षे जुन्या 'स्फिंक्स मूर्ती'चे गूढही आतापर्यंत शास्त्रज्ञांना उकलण्यात यश आले नव्हते. मात्र, आता शास्त्रज्ञांनी या अनोख्या बांधकामाचे गूढ सोडवले आहे. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी हे गूढ सोडवल्याचा दावा केला आहे.
इजिप्तमधील महाकाय आकाराची 'स्फिंक्स'(अर्धा माणूस-अर्धा सिंह) मूर्ती गवंड्यांनी हाताने तयार केली असावी, असे मानले जायचे. पण, या मूर्तीचे शरीर कसे बांधले, याचे रहस्य उलगडण्यात शास्त्रज्ञांना यश आले नव्हते. आता न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी आता एक संशोधन अहवाल तयार केला आहे, ज्यामध्ये या मूर्तीबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत. मूर्तीच्या अनोख्या आकाराबाबत या अभ्यासातून मोठी माहिती समोर आली आहे. हे संशोधन फिजिकल रिव्ह्यू फ्लुइड्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
शास्त्रज्ञांचा प्रयोग यशस्वी झाला
मीडिया रिपोर्टनुसार, संशोधकांनी मूर्तीतील कठोर आणि मऊ मातीवर प्रयोग केला. वाऱ्याचा मूर्तीवर काय परिणा होतो, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी ही माती वेगाने वाहणाऱ्या पाण्याने धुतली. यामुळे शास्त्रज्ञ या निष्कर्षापर्यंत पोहोचले की, स्फिंक्सची निर्मिती अशाच पद्धतीने झाली असावी. वाऱ्याचा परिणाम होऊन या मूर्तीने असा आकार घेतल्याचा अंदाज शास्त्रज्ञांचा आहे. स्फिंक्सचा पुतळा कसा बांधला गेला, यावर शास्त्रज्ञांनी संशोधन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 1981 मध्ये भूवैज्ञानिक फारूक एल-बाज यांनी असाच एक सिद्धांत मांडला होता. त्यांनी दावा केला होता की, ग्रेट स्फिंक्सचे शरीर वाऱ्यामुळे नैसर्गिकरित्या तयार झाले आहे.
कसा आहे ग्रेट स्फिंक्स पुतळा
ग्रेट स्फिंक्स पुतळा 73 मीटर लांब, 20 मीटर उंच आणि 19 मीटर रुंद आहे. त्याचे नाक तुटलेले आहे, जे कोणीतरी जाणूनबुजून केले असावे असा समज आहे. बारकाईने तपासले असता नाक फोडण्यासाठी छन्नीचा वापर केल्याचे दिसून येते. ग्रेट स्फिंक्सच्या हरवलेल्या नाकाचा सर्वात जुना उल्लेख 15 व्या शतकातील इतिहासकार अल-माक्रीझीच्या लेखनात आहे.