३५ वर्षापूर्वी दुरावलेले माय-लेक पुरामुळे भेटले; कहाणी ऐकून सगळेच सुखावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 12:50 PM2023-08-01T12:50:14+5:302023-08-01T12:50:43+5:30
पत्नी आणि मुलांसह त्यांना आईला भेटायचे होते. पुढच्या दिवशी कुटुंब आणि मित्रांसोबत ते घरी पोहचले आणि तिथे आई-मुलाची भेट झाली.
गुरुदासपूर – पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये एक मुलगा ३५ वर्षांनी आईला भेटला. जगजित सिंग नावाच्या या मुलाची कहाणी ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. गेल्या ३५ वर्षापासून आपले आई-वडील या जगात नाहीत असाच जगजित सिंगचा गैरसमज होता. लहानपणापासून आजी आजोबांनीच जगजितला मोठं केले. आज ३५ वर्षांनी जगजित सिंग यांना त्यांची आई हरजित कौर जिवंत असल्याचे कळताच त्यांना सुखद धक्का बसला.
इतक्या वर्षांनी जगजित सिंग आईला भेटल्यानंतर तिला मिठी मारली. आई हरजित कौरदेखील मुलाला पाहून आनंदी झाल्या. त्यानंतर आईनं मुलगा जगजित सिंग यांना जी कहाणी सांगितली ती ऐकून जगजितच्या डोळ्यात पाणी आले. गुरुदासपूरमध्ये कांदिया धर्मपूर परिसरात जगजित सिंग पुरग्रस्त लोकांची सेवा करण्यासाठी पोहचले होते. त्यावेळी त्यांच्या आत्याचा फोन आला. तेव्हा तुझं पटियालाच्या बोहडपूर इथं गाव असल्याचे सांगितले. त्यानंतर जगजित सिंग त्यांच्या मूळ गावी गेले.
जगजित सिंग गावात त्यांचे घर शोधत होते तेव्हा तिथे आजी भेटली. तिने सांगितले की, हरजीत कौरचं लग्न करनालमध्ये झाले होते. परंतु त्यानंतर पतीचे अपघाती निधन झाले. त्यांना सोनू नावाचा मुलगा होता. जेव्हा जगजितनं तो सोनू मीच असल्याचे म्हटलं तेव्हा संपूर्ण वातावरण भावूक झाले. जगजित सिंग त्यादिवशी आईला भेटले नाहीत. पत्नी आणि मुलांसह त्यांना आईला भेटायचे होते. पुढच्या दिवशी कुटुंब आणि मित्रांसोबत ते घरी पोहचले आणि तिथे आई-मुलाची भेट झाली.
आईला पाहून जगजित सिंगच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आजीने सांगितले की, आईचं तिनदा ऑपरेशन झाले आहे. लहानपणापासून मला माझ्या आई वडिलांचा अपघातात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मला २ वर्षापासून माझ्या आजी-आजोबांनी सांभाळले. आजोबा हरियाणा पोलीस दलात नोकरी करत होते. निवृत्त झाल्यानंतर ते कांदियात येऊन राहिले. आई हरजित कौर म्हणाल्या की, लग्नानंतर २ वर्षातच पतीचे निधन झाले. त्यावेळी जगजित ८ महिन्याचा होता. १ वर्षापर्यंत मी त्याचे पालन केले. परंतु त्यानंतर मला माझ्या मुलापासून वेगळे करण्यात आले. माझे दुसरे लग्न करण्यात आले. त्या लग्नातून ३ मुलींना मी जन्म दिला. त्यांचे लग्न झाले आहे. दुसऱ्या पतीचे १५ वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे.
जगजित सिंग सोमवारी आई हरजित कौर यांना त्यांच्या गुरुदासपूर येथील राहत्या घरी घेऊन गेले. त्याठिकाणी जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. कुटुंबानेही आनंदात त्यांचे स्वागत केले. आई-लेकाच्या भेटीने गावकरीही सुखावले होते. पत्नी आणि मुलांच्या आनंदाला पारावर उरला नाही.