...अन् तो म्हणाला, ‘मग प्रत्येकीशीच लग्न करू का?’; एक फोन लावला अन् सारेच बदलले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 06:02 AM2023-05-05T06:02:43+5:302023-05-05T06:03:39+5:30
भामट्याच्या प्रेमात पडली शिकली सवरली मुलगी
नरेश डोंगरे
नागपूर - तिला गोड-गुलाबी स्वप्न दाखविणाऱ्या दिल्लीतील प्रियकराला रेल्वे पोलिसांनी फोन केला अन् तो असे काही बोलला की, या तरुणीच्या प्रेमाची नशाच उतरली. ती ठाण्यात हमसून हमसून रडली अन् प्रेमभंगाचे दु:ख घेऊन घरी परतली. आई-बाबांसह कुटुंबीयांचा विरोध झिडकारून विना लग्नाची ससुराल निघालेल्या तरुणीबाबतची ही रिअल स्टोरी बुधवारी सायंकाळी रेल्वेस्थानकावर उघड झाली.
सजनी (२५) अन् तिच्याच वयाचा साजन (दोघांचीही नावे काल्पनिक) वर्षभरापूर्वी राजस्थानमध्ये एका लग्नसमारंभात भेटले. त्यांची जवळीक वाढली अन् मोबाइल नंबरही एक्स्चेंज झाले. ते तासनतास एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. ती त्याच्या प्रेमात पडली. इकडे सजनीच्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्याने ती बिथरली. तिचे आई-वडील यामुळे कमालीचे अस्वस्थ झाले. यातच, बुधवारी अचानक सजनी घरून निघाली. बराच वेळ होऊनही ती परतली नाही. कावरेबावरे झालेले कुटुंबीय रेल्वेस्थानकाकडे धावले. शोधाशोध केली. सजनी दिसत नव्हती. त्यामुळे ते रेल्वे पोलिस ठाण्यात पोहोचले. आईने दिलेल्या माहितीवरून सजनी दिल्लीला जाऊ शकते, असा अंदाज बांधून ठाणेदार मनीषा काशीद यांनी सहकाऱ्यांना शोध घेण्यासाठी पाठवले. त्यावेळी सजनी तिकीट काउंटरवर आढळली.
तीन वेळा आला, तीस हजार हडपले
बडी बडी बाते करून सजनीला गोड-गुलाबी स्वप्न दाखविणारा सोनू रिकामटेकडा अन् बोलबच्चन वृत्तीचा असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले. तो तिला भेटण्यासाठी तीन वेळा नागपुरात आला होता. त्याने सजनीकडून ३० हजार रुपये हडपल्याचेही चाैकशीत पुढे आले आहे.
फोन लावला अन् सारेच बदलले
खातरजमा करण्यासाठी मनीषा काशीद यांनी साजनला फोन लावला. सजनी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी निघाली आहे. तू तयार आहे का, असा त्याला थेट सवाल केला. स्पीकर सुरू आहे, सजनी आणि आम्ही सर्व ऐकत आहोत, हेदेखील सांगितले. त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. ‘मी तिला बोलवलेच नाही. सजनीसारख्याच माझ्या अनेक मैत्रिणी आहेत. मी का प्रत्येकीशी लग्न करू का,’ असा उलट सवालही त्याने केला. ते ऐकून सजनी सैरभैर झाली. हमसून हमसून रडली. तिला शांत करत पोलिसांनी तिचे समुपदेशन केले.