५० वर्षीय चीनी व्यक्तीचा खतरनाक कारनामा, सिगारेट ओढता ओढता पूर्ण केली ४२ किमीची मॅरेथॉन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 10:22 AM2022-11-18T10:22:00+5:302022-11-18T10:23:40+5:30
Chinese Man Marathon: सध्या त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Chinese Man Marathon: मॅरेथॉन धावण्याचा उद्देश फिटनेसला प्रोत्साहन देणे आणि आरोग्य सुधारणे हा आहे. मॅरेथॉन धावणे सोपे नाही. यासाठी प्रशिक्षण आणि निरोगी जीवनशैलीप्रती वचनबद्धता आवश्यक आहे. जे मॅरेथॉन धावतात ते लोक आरोग्याबाबत सर्वात जागरूक मानले जातात. मात्र, 'अंकल चेन' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चिनी धावपटूने चेन-स्मोकिंग करताना मॅरेथॉन पूर्ण केली. त्यांचे मॅरेथॉनमध्ये धावतानाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
रिपोर्ट्सनुसार ४२ किलोमीटरची 'झिनजियांग मॅरेथॉन' चीनच्या जिआंदे शहरात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जवळपास १ हजार धावपटू सहभागी झाले होते. त्याच ५० वर्षांची ही व्यक्तीही सहभागी झाली होती. मॅरेथॉन दरम्यान धावताना ते एका मागोमाग एक सिगरेटही ओढत होते.
३ तास २८ मिनिटांत मॅरेथॉन पूर्ण
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ५० वर्षीय चेन यांनी ६ नोव्हेंबर रोजी चीनमधील जिआंदे येथे स्मोकिंग करत करतच ४२ किमीची मॅरेथॉन पूर्ण केली. स्पर्धेत भाग घेतलेल्या सुमारे १५०० धावपटूंपैकी ५७४ वे स्थान त्यांनी मिळवलं. त्यांनी तीन तास 28 मिनिटांत ही मॅरेथॉन पूर्ण केली. सिगारेट ओढत असतानाच त्यांनी हा कारनामा केला. त्यांचे सर्व फोटो सर्वप्रथम Weibo या चिनी सोशल मीडिया अॅपवर व्हायरल झाली, ज्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान, कार्यक्रमाच्या आयोजकांनीही नंतर त्यांचे फिनिशिंग सर्टिफिकेट वाटून त्यांच्या यशाचा आनंद साजरा केला.
Chinese man runs a 3:28 marathon while chain-smoking:https://t.co/HoYiXHQRNXpic.twitter.com/KxbbAExf1a
— Canadian Running (@CanadianRunning) November 14, 2022
यापूर्वीही त्यांनी मॅरेथॉन केली होती पूर्ण
ते अंकल चेन या नावाने प्रसिद्ध आहेत. रनिंग मॅगझिनच्या मते, त्यांनी २०१८ मध्ये ग्वांगझू मॅरेथॉन आणि २०१९ मध्ये झियामेन मॅरेथॉन अशीच स्मोकिंग करत पूर्ण केली होती. त्यांनी २०१८ मध्ये ३:३६ तासांत आणि २०१९ मध्ये ३:३२ तासांत मॅरेथॉन पूर्ण केली. रिपोर्टनुसार अंकल चेन यांनी अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये देखील भाग घेतला होता. ज्यामध्ये त्यांनी १२ तासांत ५० किमीचे अंतर पार केले होते.