ती मी नव्हेच! ऑर्डर नाही, पेमेंट नाही तरीही महिलेच्या घरी आली १०० पार्सलची डिलिव्हरी अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 06:26 PM2023-07-29T18:26:58+5:302023-07-29T18:33:47+5:30
नक्की गोंधळ काय, कसा झाला उलगडा.. वाचा सविस्तर
Online Delivery Confusion: ऑनलाइन डिलिव्हरीच्या युगात, आपण काहीही ऑर्डर करतो आणि ते काही वेळेत घरी पोहोचते. पण विचार करा जर काहीही ऑर्डर न करता कोणाच्या घरी पार्सल पोहोचले तर खूप आश्चर्य वाटेल ना... त्यातही ते पार्सलचे खोके भरपूर असतील तर.... असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला जेव्हा अचानक एकामागून एक शंभर पार्सल तिच्या घरी पोहोचले. हे सर्व पार्सल ऑर्डर न देता आले. त्यात आकर्षक आणि मौल्यवान वस्तू होत्या. हे सर्व पाहून महिलेचा विश्वासच बसला नाही. नंतर मात्र हा सारा गोंधळ लक्षात आला.
नक्की काय झाला होता गोंधळ?
ही घटना अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा सर्व प्रकार येथे राहणाऱ्या सिंडी स्मिथ नावाच्या महिलेसोबत घडला. महिलेच्या घरी एक एक पार्सल येऊ लागले. हे सर्व पार्सल अॅमेझॉन या शॉपिंग वेबसाइटवरून येत होते. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने एकाही वस्तूची ऑर्डर दिली नव्हती तरीही 100 हून अधिक पॅकेजेस तिच्या घरी पोहोचवण्यात आली. न्यूयॉर्क टाईम्सने वृत्त दिले की त्यात सुमारे 1,000 हेडलॅम्प, 800 ग्लू गन आणि डझनभर जोड्या दुर्बिणी होत्या.
अखेर समोर आला सगळा प्रकार
हा सगळा प्रकार पाहून महिलेला हा गोंधळ असल्याचे वाटले. त्यानंतर कोणताही मेसेज न आल्याने महिलेने या वस्तू सर्वांना वाटायला सुरुवात केली. त्याने शेजाऱ्यांनाही काही सामान दिले. अखेर या महिलेने अॅमेझॉनशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली असता तपासाअंती ही बाब समोर आली. चुकून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. तपासाअंती अॅमेझॉनने पुष्टी केली की ही पार्सल एका गोदामात पाठवायची होती, पण चुकून महिलेच्या पत्त्यावर पाठवली गेली, त्यामुळे गोंधळ झाला.
विक्रेत्यांचे संशयास्पद वर्तन शोधून तपास करून अशा प्रकारची कारवाई थांबविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती या प्रकरणी देण्यात आली. दुसऱ्या एका मीडिया रिपोर्टनुसार, अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. याआधीही वॉशिंग्टनमधून अशीच एक घटना समोर आली होती जेव्हा एका माणसाच्या घरात त्याने ऑर्डर न केलेल्या बेबी शीट्सच्या पॅकेजेस भरल्या होत्या.