#SHOCKING : रस्त्यावर भीक मागणारा गेला विमानातून घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 12:54 PM2018-01-29T12:54:53+5:302018-01-29T13:06:05+5:30
रस्त्यावर भिक मागून आपल्या पोटाची भूक भागवणारा एक व्यक्ती थोड्याच वेळात विमानाने आपल्या घरी परत गेला.
लखनऊ : आपण मध्यंतरी एक बातमी वाचली की, एक करोडपती व्यवसायिक त्याचा व्यवसाय बुडाल्याने एका बेटावर जाऊन राहतोय. असाच एक प्रकार लखनऊमध्ये समोर आलाय. करोडपती असलेली व्यक्ती रस्त्यावर चक्क भीक मागताना आढळली. मात्र जेव्हा या व्यक्तीची ओळख पटली तेव्हा तो इसम विमानाने आपल्या घरी गेला.
उत्तरप्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यातील कस्बे रोडववर एक व्यक्ती भीक मागताना एका महाराजांना दिसली. स्वामी भास्कर स्वरुप या महाराजांनी त्या इसमाची जेवणाची व्यवस्था केली. जेवण झाल्यानंतर त्या इसमाला स्वच्छ करण्यात आलं. त्यांना अंघोळ घालण्यात आली, त्यांचे केस कापण्यात आले. त्यांचे कपडे धुवताना मंदिरातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या खिशात आधार कार्ड आणि एफडीचे कागदपत्रे सापडले. त्यांची एफडी पाहूनच सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यांच्या एफडीवर चक्क १ कोटी ७ लाख रुपये होते.
आणखी वाचा - एकेकाळी करोडपती असलेला हा इसम आता झाला संन्यासी आणि राहतो बेटावर
आधार कार्डच्या माहितीनुसार ही वृद्ध व्यक्ती तामिळनाडूच्या थिरुवनावली येथे राहणारे होते. त्यांचं नाव मुथैया नादर असं आहे. मुळात ते भिकारी नसून करोडपती आहेत. त्यांच्या आधारकार्डच्या माहितीनुसार त्यांच्या घरच्यांचा पत्ता शोधण्यात आला. पत्ता शोधताना त्यांच्या मुलीशी संपर्क झाला. मुलीनं लगेच तामिळनाडूतून लखनऊला येऊन आपल्या वडिलांना ओळखलं.
त्यांच्या मुलीनं दिलेल्या माहितीनुसार, ‘सहा महिन्यांपूर्वी तिचे वडिल तीर्थ यात्रेसाठी निघाले होते. मात्र त्यानंतर त्यांचा काहीच संपर्क होऊ शकला नाही. त्यांना शोधण्यासाठी जंग जंग पछाडण्यात आलं. मात्र तरीही ते सापडले नाही. पण आता सहा महिन्यांनी त्यांना सुखरूप पाहून मी आनंदित झाली आहे.’ एवढ्या महिन्यांनंतर वडिलांना सुखरूप पाहून तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. वडिलांशी संपर्क करून दिल्यामुळे तिनं स्वामी आणि मंदिरातील इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले. रस्त्यावर खितपत पडलेला हा व्यक्ती घरी जाताना मात्र ऐटीत विमानात बसून गेला.