Shocking: पत्नी म्हणाली, दारू-सिगरेट सोड नाहीतर घर; पतीने घेतला आश्चर्यचकित करणारा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 12:45 PM2022-03-30T12:45:07+5:302022-03-30T12:45:32+5:30
Jara Hatke: घरातील लोक त्याला सिगारेट, दारू सोडण्यास सांगत होते, म्हणून त्याने घर सोडले आणि विमानतळावर राहू लागला.
अनेकांना सिगरेट, पान, तंबाखू, गुटखा, दारुचे व्यसन असते. त्यांना घरातील लोक कसे सहन करत असतात, त्यांचे त्यांनाच माहिती. अशाच एका व्यक्तीला त्याच्या पत्नीने चिडून दोन पर्याय दिले. एकतर दारू-सिगारेट सोड नाहीतर घर, असे पर्याय ठेवले. यावर पतीने सर्वांना हैरान करणारा निर्णय घेतला आहे.
हा व्यक्ती गेल्या १४ वर्षांपासून विमानतळावर राहतो. त्याने आपले घर सोडले आहे. घरातील लोक त्याला सिगारेट, दारू सोडण्यास सांगत होते, म्हणून त्याने घर सोडले आणि विमानतळावर राहू लागला. हा प्रकार चीनमधील आहे. वेई जियानगुओ हा व्यक्ती बीजिंग इंटरनेशनल एयरपोर्टवरील वेटिंग एरियात राहत आहे. सुरुवातीला काही दिवस तो रेल्वे स्टेशवर देखील राहिला होता. विमानतळावर तो त्याच्या मर्जीनुसार खाऊ पिऊ शकतो, असे त्याचे म्हणणे आहे. चायना डेलीनुसार तो आता घरी परत जाणार नाही, कारण त्याला तिथे स्वातंत्र्य मिळत नाही.
जिआनगुओचे घर विमानतळापासून १९ किलोमीटर अंतरावर आहे. 2008 मध्ये त्यांनी घर सोडले. पत्नीने बजावल्यावर त्यांनी घर सोडणे पसंत केले पण सिगारेट आणि दारू सोडली नाही. जिआंगुओने सांगितले की, त्याला विमानतळावर राहायला आवडते, कारण त्याला येथे थंडी जाणवत नाही. त्याने इथे एक छोटेसे स्वयंपाकघरही बनवले आहे. त्याचा खर्च दरमहा मिळणाऱ्या सरकारी अनुदानातून तो त्याचा खर्च भागवतो.
जिआंगुओ विमानतळावर येणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला त्रास देत नाही, त्यामुळेच तेथील कर्मचारी त्याला तेथून हटवत नाहीत. स्लीपिंग बॅग आणि काही सामान घेऊन तो गेल्या 14 वर्षांपासून बीजिंग विमानतळावर राहत आहे.