हटके ऑफर; स्मार्टफोन खरेदीवर मिळतोय 1 किलो कांदा मोफत!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 11:07 AM2019-12-11T11:07:22+5:302019-12-11T11:09:10+5:30
"ग्राहकांना फायदा व्हावा, या उद्देशाने ही ऑफर आणली आहे"
सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. देशातील अनेक राज्यात कांदा 100 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. यातच तामिळनाडू येथील एका दुकानदाराने स्मार्टफोन विक्रीसाठी अनोखी ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार, ग्राहकांनी स्मार्टफोन खरेदी केल्यास त्यांना एक किलो कांदा मोफत मिळणार आहे.
तामिळनाडू येथील पट्टुकोट्टईमधील एसटीआर मोबाईल दुकानात ही ऑफर आहे. ग्राहकांनी दुकानातून स्मार्टफोन खरेदी केला, तर त्यांना एक किलो कांदा मोफत दिला जाईल. ग्राहकांना फायदा व्हावा, या उद्देशाने आम्ही ही ऑफर आणली आहे, असे या दुकानाचे मालक सतीश यांनी सांगितले आहे. तसेच, ही ऑफर सुरु केल्यानंतर ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे सतिश यांनी सांगितले. तर दुसरीकडे, स्मार्टफोन आणि कांदा दोघांचीही गरज होती. त्यामुळे या ऑफरच्या माध्यमातून स्मार्टफोन आणि कांदा खरेदी केल्याचे एका ग्राहकाने सांगितले.
दरम्यान, सध्या तामिळनाडून कांदा प्रतिकिलो 140 रुपये दराने विकला जात आहे. मात्र, महाराष्ट्रात कांद्याच्या दरात हळूहळू घसरण होत आहे. आठवडाभरापूर्वी 160 रुपये किलो दराने मिळणारा जुना कांदा आता 140 रुपये किलोवर तर 120 रुपये दराने मिळणारा कांदा शंभरीवर आला आहे. काही दिवसांत शंभरीच्या आत कांद्याचे दर येण्याची शक्यता कांद्याच्या व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.