प्रेरणादायी! सफाई कामगाराची मुलगी झाली 500 कोटींची मालकीण; जाणून घ्या, 'तिची' यशोगाथा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 03:56 PM2022-10-25T15:56:38+5:302022-10-25T16:02:37+5:30
Jane Lu: जेन लूने अकाउंटंटची नोकरी सोडली. तेव्हा तिला लोकांचे टोमणे ऐकावे लागले. तिला वाईट ठरवलं गेलं, पण ती डगमगली नाही.
स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केले तर एक दिवस ती नक्कीच पूर्ण होतात. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या जेन लूसोबत असंच काहीसं घडलं आहे. तिने अकाउंटंटची नोकरी सोडली. तेव्हा तिला लोकांचे टोमणे ऐकावे लागले. तिला वाईट ठरवलं गेलं, पण ती डगमगली नाही. लोकांची पर्वा न करता जेनने तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले आणि ती यात यशस्वी देखील झाली.
जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर तिने ऑनलाईन कपड्यांची कंपनी सुरू केली आणि आता ती करोडपती झाली आहे. आज तिचा व्यवसाय तब्बल 120 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि फॅशन जगतातही तिची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. आजपर्यंत जेन लू 500 कोटींहून अधिक संपत्तीची मालकीण बनली आहे.
पालकांना न सांगता सोडली नोकरी
जेन लूचे पालक चीनमध्ये राहायला गेले. त्यांनी सुरुवातीला सफाई कामगार म्हणून काम केले. जेनने एका मोठ्या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करावं असं त्यांना वाटत होतं. पण जेनला व्यवसाय करायचा होता. अशा स्थितीत तिने पालकांना न सांगता नोकरी सोडली. ती सकाळी लवकर घरातून निघायची, ज्यामुळे तिच्या आई-वडिलांना वाटायचे की ती कामावर जात आहे, परंतु जेन यावेळी तिच्या स्वप्नांना पाठलाग करण्यात व्यस्त होती.
गॅरेजमध्ये सुरू केलं कपड्यांचं दुकान
जेनने गुपचूप तिच्या पालकांच्या गॅरेजमध्ये कपड्यांचं दुकान सुरू केलं. ती तिथे कपडे ठेवायची आणि विकायची. हळूहळू तिने एका गोडाऊनमध्ये दुकान सुरू केलं, त्याचदरम्यान तिने हे कपडे ऑनलाईन विकण्याचा विचार केला. त्यानंतर जेनने शोपो नावाची फॅशन कंपनी स्थापन केली. 2012 पर्यंत या कंपनीचे सोशल मीडियावर 20 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. हळूहळू जेनच्या कंपनीचे कपडे विकले गेले आणि ती 500 कोटींची मालक झाली. आता तिच्याकडे आलिशान घर, आलिशान गाड्या आहेत. 2016 च्या फोर्ब्सच्या यादीतही जेनचे नाव समाविष्ट झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"