श्रावण विशेष :  सातगाव व साकेगाव येथील महादेवाचे मंदिर जपतेय ऐतिहासिक वारसा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 10:18 AM2021-08-23T10:18:12+5:302021-08-23T10:20:06+5:30

Shravan Special: पुरातत्व खात्याने ही मंदिरे ताब्यात घेतली व अनेक बंधने लादली़ त्यामुळे आता भक्तांची गर्दीही येथे होत नाही़.

Shravan Special: Historical Heritage Preserving the Temple of Lord Mahadev at Satgaon and Sakegaon | श्रावण विशेष :  सातगाव व साकेगाव येथील महादेवाचे मंदिर जपतेय ऐतिहासिक वारसा 

श्रावण विशेष :  सातगाव व साकेगाव येथील महादेवाचे मंदिर जपतेय ऐतिहासिक वारसा 

googlenewsNext

-  विवेक चांदूरकर
खामगाव : बुलडाणा, चिखली, मोताळा या तीन तालुक्यांमध्ये चाळीस ते पन्नास किमी अंतरावर काही प्राचिन मंदिरे निदर्शनास पडतात़.  एकाच भागात मध्ययुगीन काळात बांधल्या गेलेली एवढी मंदिरे अन्यत्र कुठेही निदर्शनास पडत नाहीत़.  ही मंदिरे मध्ययुगीन काळातील ऐतिहासिक समृद्घता दर्शवितात. कधी काळी या गावांमध्ये मोठी वस्ती होती़.  ही गावे सत्तेची केंद्र होती़.  मात्र, कालांतराने काळाच्या ओघात शहरीकरणामुळे ही गावे ओस पडत गेली़.  पुरातत्व खात्याने ही मंदिरे ताब्यात घेतली व अनेक बंधने लादली़ त्यामुळे आता भक्तांची गर्दीही येथे होत नाही़. या मंदिरांबाबत अजून कुणी संशोधन केले नसल्यामुळे आपला इतिहासही खूपच कमी लोकांना माहिती आहे़.  या मंदिरांपैकी दोन मंदिरे सातगाव आणि साकेगावला आहे़.
    ही मंदिरे बघितल्यावर पुरातन बांधकाम शैली किती विकसित होती, याचा प्रत्यय येतो़  लाकडावरही विविध यंत्राच्या सहायाने सध्याच्या काळातही कोरीव काम करणे शक्य होणार नाही, तसे कोरीव काम दगडावर करण्यात आले आहे़.  बाराव्या शतकापूर्वी मंदिरांचे बांधकाम झाले असावे, असा अंदाज आहे. काळया पाषाणांपासून हे मंदिर बांधण्यात आले आहे़ या दगडांवर कोरलेल्या मूर्ती व शिल्प अप्रतिम आहेत़.  चिखलीपासून पाच ते सहा किमी अंतरावर असलेल्या सातगाव येथे प्राचिन मंदिर आहे़ या परिसरात चार मंदिरे आहेत़ एका मंदिरात महादेवाची पिंड आहे़. या चारही मंदिरावर चहुबाहुने शिल्प, विविध मूर्ती व नक्षीकाम कोरले आहे़  संपूर्ण दगडाचे असलेल्या या मंदिर परिसरात काही अन्य मूर्तीही पडल्या आहेत़  यापैकी सर्वात मोठे असलेले विष्णू मंदिर भूमिज स्थापत्याचा नमुना आहे़.  या मंदिरावर पुरातत्व खात्याच्यावतीने रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे़.  मंदिरावरील शेवाळ व धूळ निघाल्यामुळे मंदिर उजळले आहे़ विष्णू मंदिराचा अर्धमंडप, मंडप, अंतराल आणि गर्भगृह यावरील शिखरे सध्या पडली आहेत़.  याची डागडुजी करण्यात आली आहे़  विष्णुचे मंदिर पश्चिमाभिमुख असून, पुढे मुखमंडप व दोन बाजुला दोन अर्धमंडप असलेला अर्धखुला मंडप आहे. येथे तीन अर्धखुले मंडप असल्यामुळे मंदिरात तिन्ही बाजुंनी जाता येते़. 
    या मंदिराच्या मागच्या बाजुला महादेवाचे मंदिर आहे़ या मंदिरामध्ये नागाची मूर्ती ठेवलेली आहे़.  मंदिरावरील समोरच्या भागात प्रवेशव्दारावर बारिक शिल्पकृती कोरण्यात आली आहे़.  दगडावर केलेली ही अप्रतिम कलाकृती पाहून मन थक्क होते़.  या परिसरात विविध मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत़  या मूर्ती कोणत्या कालखंडात बनविण्यात आल्या असून, कुणाच्या आहेत, याचा शोध घेणे आवश्यक आहे़.  येथे चार फूट उंच सुर्यपत्र रेवंतची मूर्ती आहे़.  येथे देवी व देवतांच्या मूर्ती कोरल्या असलेले दगड पडलेले आहेत़ यापैकी काही मूर्ती पुर्ण तर काही मूर्ती भंगलेल्या आहेत़  या मूर्ती  देवदेवतांच्या आहेत़.  

 

साकेगाव येथील मंदिर   

    साकेगाव येथे मध्ययुगातील बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले दगडाचे मंदिर आहे़ परिसरातील ग्रामस्थांचे दैवत असलेल्या या मंदिरावर चहुबाहुने उत्कृष्ट शिल्प व मूर्ती कोरलेल्या आहेत़. आतमध्ये महादेवाची पिंड असून, मूर्तीच्या चहुबाजुने देवी, देवतांच्या मूर्ती आहेत़  या मंदिरालगत आणखी एक छोटे मंदिरही आहे़ तसेच मंदिरासमोर एक गध्धेगळ आहे़ तसेच यावर एक शिलालेखही असून, त्याचे वाचन होणे गरजेचे आहे़.    
    हे शिवमंदिर पुर्वाभत्रमुख असून, मुखमंडप, मंडप, अंतराळ आणि गर्भगृह आहे़  मंदिराच्या गर्भगृहावरील शिखर बरेच मोठे असून यावर  मूर्ती कोरल्या आहेत़ मंंदिरामध्ये प्रवेश करण्याकरिता दगडी खांबांचे प्रवेशव्दार होते़  त्याची आता पडझड झाली आहे़.  या खाबांवरील छत पडले आहे़.  या व्दारातून आतमध्ये प्रवेश केल्यावर मुख्य मंदिराचे व्दार आहे़.  या मंदिराचे बांधकाम साधारणता बाराव्या शतकात झाले असावे़  याच काळात कोथळी, सातगाव, धोत्रा नंदई येथील मंदिरांचे बांधकाम झाले आहे़  मंदिराचे शिखर उंच आहे़.  मंदिराच्या शिखरावर असलेल्या शिल्पपटात ब्रम्ह, सरस्वती, महादेव- पार्वती व विष्णु- लक्ष्मीच्या प्रतिमा आहेत. तसेच महिषासुरमर्दिनीच्या प्रतिमाही आहेत.  या मंदिराला २०१६ साली कुंपण घालण्यात आले. गावातील भाविक नियमित येथे येवून दर्शन घेतात़  मंदिर पाहण्याकरिता पर्यटकांची गर्दी होेते़.

Web Title: Shravan Special: Historical Heritage Preserving the Temple of Lord Mahadev at Satgaon and Sakegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.