बाप-पोरीच्या प्रेमाची गोष्ट, मुलीला लग्नात आयफोन 8 भेट देण्यासाठी वडिलांनी गाठलं सिंगापूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 09:50 AM2017-09-25T09:50:51+5:302017-09-25T09:52:17+5:30
मुलीला लग्नात आयफोन ८ भेट देण्यासाठी एका मुलीचे वडील भारतातून थेट सिंगापूरला पोहोचले.
मुंबई- मुलगी आणि वडील यांच्याचील प्रेमाबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू उमटावं यासाठी वडील हवं ते करायला तयार असतात. विशेष म्हणजे मुलीने एखादी गोष्ट मागितली तर तिला ती गोष्ट देण्यासाठी धडपड वडील करताना दिसतात. मुलगी लहान असताना पुढे शाळेत गेल्यावर आणि त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यावर तिचे सगळे लाड पुर्ण केले जातात. आयुष्याच्या विविध टप्प्यावर त्या त्या ट्रेण्डनुसार वागायचा प्रयत्न हा नेहमीच वडिलांकडून केला जातो. विशेष म्हणजे मुलीचं लग्न हा वडिलांसाठी अतिशय हळवा क्षण असतो. लग्नानंतरही मुलगी सुखी राहावी यासाठी वडिलांची धडपड सुरु असतेच. असाच एक प्रसंग नुकताच घडला. आपल्या लाडक्या मुलीला लग्नात आयफोन ८ भेट देण्यासाठी एका मुलीचे वडील भारतातून थेट सिंगापूरला पोहोचले. विशेष म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती असलेली ही व्यक्ती फोन खरेदी करण्यासाठी अॅपल स्टोअरच्या बाहेर १३ तास रांगेत उभी राहिली होती.
अमीन अहमद ढोलिया असं या व्यक्तीचं नाव असून त्यांचं वय ४३ वर्ष आहे. अमीन ढोलीया मुलीला देण्यासाठीच्या आयफोन ८ च्या खरेदीसाठी सिंगापूरला तर गेलेच पण तब्बल 13 तास रांगेतही थांबले. मी माझ्या २ मुलींसाठी २ फोन खरेदी करणार आहे. मी पहिल्यांदाच एखाद्या गोष्टीसाठी रात्रभर रांगेत थांबलो, असं अमीन ढोलिया यांनी म्हंटलं आहे. सकाळी जेव्हा कंपनीने आपलं दुकान उघडलं तेव्हा त्यांच्या रांगेत २०० हून अधिक जण होते. यातील बहुतांश लोक परदेशी होते, असंही ढोलिया यांनी सांगितलं आहे. नुकताच १२ सप्टेंबर रोजी आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस लॉन्च करण्यात आला. इतर देशात कुठेच आयफोनचे हे नवीन मॉडेल लॉन्च न झाल्याने सिंगापूरमधील दुकानात मोठी गर्दी झाली होती. मे महिन्यात आयफोनचे सिंगापूरमधील हे स्टोअर सुरु झालं असून तेव्हापासून लॉन्च करण्यात आलेले हे पहिलेच मॉडेल्स आहेत. त्यामुळे मुलीला आयफोन 8 भेट देण्यासाठी तिच्या वडिलांना थेट सिंगापूर गाठावं लागलं.
आयफोन 8 ची वैशिष्ट्यं
आयफोन 8च्या दोन्ही बाजूने ग्लास देण्यात आली आहे. सिल्वर, ग्रे आणि गोल्ड या तीन रंगात आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस सादर करण्यात आला. या फोनचे सर्वांत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याला वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे युजरला प्रत्येक ठिकाणी चार्जर बाळगण्याची गरज भासणार नाही. आयफोन ८ चा डिस्प्ले हा ४.७ इंच तर आयफोन ८ प्लसचा डिस्प्ले हा ५.५ इंच इतका असेल. नवीन आयफोनची ग्लास आतापर्यंतची सर्वांत टिकाऊ ग्लास असेल. पाणी आणि धुळीपासून प्रतिरोध करणारा हा फोन आहे. यामध्ये 3D टच आणि ट्रू टोन डिस्प्ले आहे.