14500 फूट उंचीवरुन जमिनीवर कोसळली महिला, मुंग्या बनल्या देवदूत; असा वाचवला जीव...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 07:48 PM2023-12-01T19:48:31+5:302023-12-01T19:50:01+5:30
पॅराशूट घेऊन उडी मारली, पण ऐनवेळी पॅराशूटने दगा दिला.
जगात अनेक चकीत करणारे अपघात/दुर्घटना घडल्या आहेत, ज्यात व्यक्तीचा चमत्कारिकरित्या जीव वाचला आहे. साधारणपणे 45-50 फूट उंचीवरून एखादी व्यक्ती पडली तर त्याचा मृत्यू होण्याची शक्यता 50 टक्के असते. पण जर कोणी 80 फूट किंवा त्याहून अधिक उंचीवरून पडला तर मृत्यूचे प्रमाण 100 टक्क्यांपर्यंत वाढते. आज आम्ही तुम्हाला एका महिलेबद्दल सांगणार आहोत, जी चक्क 14,500 फूट उंचीवरुन पडल्यानंतरही वाचली. आम्ही ज्या महिलेबद्दल बोलत आहोत, त्या माजी अमेरिकन स्कायडायव्हर जोन मरे आहेत. जोन यांच्यासाठी मुंग्या देवदूत म्हणून आल्या आणि त्यांचा जीव वाचवला.
78 वर्षीय जोन मरे त्यांच्या स्कायडायव्हिंग कारनाम्यासाठी ओळखल्या जातात. पॅराशूट न उघडल्याने हजारो फूट उंचीवरून पडल्यानंतरही त्या चमत्कारिकरित्या बचावल्या. 25 सप्टेंबर 1999 रोजी पॅराशूट न उघडल्याने जोन यांना 4,400 मीटर (14,500 फूट) उंचीवरुन पडण्याच्या अतिवेदनादायक अनुभवाचा सामना करावा लागला.
In 1999, skydiver Joan Murray's parachute malfunctioned, causing her to fall 14,500 feet.
— Morbid Knowledge (@Morbidful) November 29, 2023
Her backup parachute opened at 700 feet, but it quickly deflated and she continued to plummet towards the ground at 80 miles per hour.
Miraculously, Murray survived the fall thanks to the… pic.twitter.com/C5zCSIt0DA
या भीषण अपघातानंतरही त्यांनी हार मानली नाही, आणि दोन वर्षांनंतर पुन्हा स्कायडायव्हिंग केले. तो अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. जोन व्यवसायाने बँकर होत्या, पण त्यांना स्कायडायव्हिंगचीही आवड होती. त्या घटनेपूर्वी त्यांनी 35 वेळा पॅराशूटने उड्या मारल्या होत्या. पण, दक्षिण कॅरोलिना येथील चेस्टर काउंटीची 36 वी उडीत त्यांचे पॅराशूट उघडले नाही. पण संयम दाखवत जोनने राखीव पॅराशूट उघडण्यात यश मिळविले.
ताशी 80 मैल वेगाने खाली पडल्या
दुर्दैवाने राखीव पॅराशूटनेही जोनला साथ दिली नाही आणि त्या ताशी 80 मैल वेगाने खाली पडू लागल्या. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. इतक्या उंचीवरून पडूनही जोन चमत्कारिकरित्या बचावल्या. पण गंभीर दुखापतींवर उपचार करण्यासाठी त्यांना अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. दोन आठवडे त्या कोमातही होत्या.
जोन वाचल्या कशा?
आता एवढ्या उंचीवरुन पडल्यावर कोणी कसे जगू शकेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जोन मुंग्यांच्या वारुळावर पडल्या होत्या. त्यांना शुद्ध आली तेव्हा त्या श्वास घेत होत्या, पण हालचाल करू शकत नव्हत्या. यादरम्यान मुंग्यांनी त्यांना दोनशेहून अधिक वेळा चावा घेतला. विशेष म्हणजे मुंग्यांच्या नांगीनेच त्यांचा जीव वाचल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुंग्यांच्या विषारी डंकाने जोनच्या हृदयाला धक्का बसला, त्यामुळेच हृदयाचे ठोके थांबले नाहीत. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांचा जीव वाचला.