जगातलं सर्वात लहान जिवंत बाळ, वजन केवळ २६८ ग्रॅम!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 01:08 PM2019-02-28T13:08:49+5:302019-02-28T13:12:22+5:30
जपानच्या टोकियोमध्ये जगातल्या सर्वात लहान बाळाचा जन्म झाला. या बाळाजी स्थिती इतकी खालावलेली होती की, त्याला २४ आठवडे आई-वडिलांकडे सोपवलं नव्हतं.
जपानच्या टोकियोमध्ये जगातल्या सर्वात लहान बाळाचा जन्म झाला. या बाळाजी स्थिती इतकी खालावलेली होती की, त्याला २४ आठवडे आई-वडिलांकडे सोपवलं नव्हतं. या बाळाचं जन्मावेळचं वजन हे केवळ २६८ ग्रॅम इतकं होतं. २४ आठवड्यांपूर्वी आईच्या गर्भाशयात बाळाचा विकास होणं थांबलं होतं. त्यानंतर सर्जरी करून बाळाला जन्म देण्यात आला. आता २४ आठवड्यांनी या बाळाला चांगल्या तब्येतीसोबत आई-वडिलांकडे सोपवण्यात आलं आहे.
आता इतकं आहे वजन
जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हा त्याचं वजन फारचं कमी होतं. त्यामुळे डॉक्टरांसमोर पेच निर्माण झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर वेगवेगळे उपचार केले. आता या बाळाचं वजन ३१७५.१५ ग्रॅम इतकं आहे. ही घटना टोकियोच्या कीओ यूनिव्हर्सिटी रुग्णालयातील आहे.
आईने विश्वास गमावला होता
या बाळाच्या आईने सांगितले की, 'मला फक्त इतकंच सांगायचंय की, मी फार आनंदी आहे. खरंतर मला अजिबात वाटलं नव्हतं की, माझं बाळ जिवंत राहील. पण देवाच्या कृपेने तो जिवंत आणि सुदृढ आहे'.
सायन्सवर होता डॉक्टरांचा विश्वास
या बाळावर उपचार करणारे डॉक्टर ताकेशी अरिमित्सु म्हणाले की, 'जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हा ते फारच लहान आणि कमजोर होतं. पण माझा मेडिकल सायन्सवर पूर्ण विश्वास होता'. कीओ यूनिव्हर्सिटी रूग्णालयाच्या नावावर आता जगातल्या सर्वात लहान बाळाची डिलिव्हरी करण्याचा आणि त्याला सुदृढ ठेवण्याचा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.
आधी जर्मनीत झाला होता रेकॉर्ड
याआधी जगातलं सर्वात लहान बाळ जन्माला येण्याचा रेकॉर्ड जर्मनीमध्ये झाला होता. २००९ मध्ये इथे एका मुलाचा जन्म झाला होता, त्याचं वजन केवळ २७४ ग्रॅम इतकंच होतं. तर सर्वात छोट्या मुलीचा रेकॉर्डही जर्मनीतच झाला होता. २०१५ मध्ये इथे एक २५२ ग्रॅम वजनाची मुलगी जन्माला आली होती. हा रेकॉर्ड सर्वात लहान जिवंत बाळांच्या डिलेव्हरीचा आहे.