20 वर्षांपूर्वी दुरावले, व्हॉट्स अॅपवर सापडले, सोशल मीडियावरून झाली पिता-पुत्रांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 11:53 AM2019-01-07T11:53:13+5:302019-01-07T11:55:38+5:30
20 वर्षांपूर्वी कुटुंबीयांशी नाते तोडून बेपत्ता झालेल्या वडलांची तब्बल दोन दशकांनंतर सोशल मीडियावरून आपल्या मुलाशी भेट झाल्याची घटना समोर आली आहे.
बंगळुरू - 20 वर्षांपूर्वी कुटुंबीयांशी नाते तोडून बेपत्ता झालेल्या वडलांची तब्बल दोन दशकांनंतर सोशल मीडियावरून आपल्या मुलाशी भेट झाल्याची घटना समोर आली आहे. व्हॉट्सअॅपवरून आपल्या दुरावलेल्या वडलांची माहिती मिळाल्यानंतर मुलाने वडलांकडे धाव घेतली आणि सुमारे 20 वर्षांनंतर पिता-पुत्रांची भेट झाली.
त्याचे झाले असे की, राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातील झाब गाव येथील महावीर सिंह चौहान हे मुंबईत व्यवसाय करत होते. दरम्यान, व्यवसायात प्रचंड नुकसान झाल्यानंतर 1998 साली त्यांनी खजील होऊन कुटुंबीयांशी नाते तोडले. त्यानंतर बराच काळ ते बेपत्ता होतो. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार देऊन त्यांची बरीच शोधाशोध केली, पण त्यांचा शोध लागला नाही. अखेर पाच वर्षे शोध घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हात टेकले.
दरम्यान, महावीर हे गेल्या शनिवारी कर्नाटकमधील डोड्डाबल्लापुरा येथे बेशुद्धावस्थेत सापडले. तिथे ते सुपरवायझर म्हणून काम पाहत होते. आजारी महावीर यांना त्यांचे मित्र रवी आणि किशोर कुमार हे त्यांना स्थानिक रुग्णालयात घेऊन गेले. मात्र त्यांच्या आजाराचे स्वरूप गंभीर असल्याने त्यांचे मित्र चिंतीत झाले. त्यात महावीर हे विवाहित असून, त्यांना दोन मुले आहेत एवढीच माहिती त्यांना होती.
अखेर रवी आणि किशोर कुमार यांनी महावीर यांचे छायाचित्र आणि ड्रायव्हिंग लायसनवरील माहिती व्हॉट्सअॅपवर शेअर करण्याचा निर्यण घेतला. त्यानंतर महावीर यांच्याबद्दल माहिती देणारे अनेक मेसेज आणि फोन कॉल्स त्यांना आले. मात्र राजस्थानमधील एका गावातून आलेल्या फोनने त्यांना दिलासा दिला. तो फोन महावीर यांचा मुलगा प्रद्युमन याचा होता. त्याने फोटो आणि त्यासोबतच्या माहितीवरून आपल्या वडलांना ओळखले. तसेच दुसऱ्याच दिवशी विमानाने बंगळुरू येथे येत असल्याचे सांगितले.
दुसऱ्या दिवशी बंगळुरूला येत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महावीर यांचे पाय धरून प्रद्युमन याने नमस्कार केला. तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू तरळले. महावीरसुद्धा इतक्या वर्षांनंतर आपल्या मुलाला पाहून हमसून हमसून रडू लागले. ''मी आज माझ्या सर्व चुकांमधून मुक्त झालोय, मला घरी घेऊन जा, अशी विनंती त्यांनी मुलाकडे केली.'' त्यावेळी 20 वर्षांनंतर भेटलेल्या आपल्या पित्याला पाहून प्रद्युमनही आपल्या भावनांना आवर घालू शकला नाही.