अबब! १.३२ कोटींना विकला गेला पायऱ्यांचा तुकडा, पण इतका महाग का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 12:05 PM2018-12-13T12:05:24+5:302018-12-13T12:12:31+5:30
अनेकजण आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक वर्ष किंवा महिन्यांपासून पैसे जमवत असतात. पण जगात असेही काही लोक आहेत, जे कोट्यवधी रुपये असे खर्च करतात, जसे तुम्ही चणे-फुटाणे घेण्यासाठी खर्च करता.
अनेकजण आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक वर्ष किंवा महिन्यांपासून पैसे जमवत असतात. पण जगात असेही काही लोक आहेत, जे कोट्यवधी रुपये असे खर्च करतात, जसे तुम्ही चणे-फुटाणे घेण्यासाठी खर्च करता. अशीच एक जरा हटके घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने तब्बल १.३२ कोटी रुपये खर्च करुन चक्क पायऱ्यांचा एक तुकडा विकत घेतला आहे.
आता तुम्ही म्हणाल की, इतकी किंमत मोजायला या पायऱ्यांमध्ये काय आहे? हा प्रश्न पडणं स्वाभाविकही आहे. या पायऱ्यांची इतकी किंमत असण्याचं कारण म्हणजे या पायऱ्या अनेकवर्ष आयफेल टॉवरचा भाग होत्या. शोभेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी जगभरातील श्रीमंत लोक हे लाखों-कोट्यवधी रुपये खर्च करतात. त्याचंच ताजं उदाहरण या पायऱ्या आहेत. या पायऱ्या १ कोटी ३२ लाख ८३ हजार ८५० रुपयांना विकला गेल्या आहे. या पायऱ्या ऐतिहासिक आयफेल टॉवरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचा भाग होत्या. या पायऱ्या खरेदी करणारा व्यक्ती हा अरब देशातील आहे.
कमी किंमतीचा होता अंदाज
या पायऱ्यांचा लिलाव नुकताच करण्यात आला. पण या लिलावात पायऱ्यांना इतकी मोठी रक्कम मिळेल असा लिलाव करणाऱ्यांनीही विचार केला नव्हता. लिलाव करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अंदाज लावला होता की, या पायऱ्या ३१ ते ४७ लाखांत विकला जाईल. पण जी रक्कम मिळाली ती आश्चर्याचा धक्का देणारी ठरली.
आधी होत्या पायऱ्या, नंतर आली लिफ्ट
या पायऱ्या ४.३ मीटर उंच आहे. म्हणजे साधारण १४ फूट. ३२४ मीटर सुंदर आयफेल टॉवरचं निर्माण करणाऱ्या फ्रेन्च इंजिनिअर गुस्ताव एफिलने या पायऱ्या तयार केल्या होत्या. आधी आयफेल टॉवरमध्ये पायऱ्यांच्या मदतीने वरच्या मजल्यावर जाण्याची व्यवस्था होती. पण १९८३ मध्ये पायऱ्या कापून लिफ्ट लावली गेली. त्यानंतर टॉवरच्या पायऱ्यांचे २४ तुकडे करण्यात आले.
याआधी यापेक्षाही जास्त मिळाली होती किंमत
जर तुम्हाला वरील किंमत वाचून धक्का बसला असेल तर जरा स्वत:ला सावरा. कारण २०१६ मध्ये आशियातील एका व्यक्तीने याच पायऱ्यांचा एक भाग ४.१६ कोटी रुपयांना खरेदी केला होता. यात १४ पायऱ्या होत्या. मग विचार करा लोक आपल्या आवडीसाठी किती पैसे खर्च करतात.