नव्या इमारतीसाठी जुने घर पाडले अन् भिंतीत तब्बल 46 लाख सापडले पण...; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 12:01 PM2023-02-06T12:01:29+5:302023-02-06T12:02:47+5:30
एवढी मोठी रक्कम मिळताच टोनो खूप जास्त खूश झाला. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही.
स्पेनमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. एका बिल्डरने रिटायरमेंटनंतरचे आयुष्य घालवण्यासाठी घर विकत घेतले आहे. अनेकदा घरामध्ये दुरुस्ती करताना काही जुन्या गोष्टी मिळतात, ज्याने आपण आनंदी होतो. पण टोनो पिनेइरो नावाच्या या बिल्डरच्या हातात मोठी रक्कम आली. ही रक्कम 47 हजार युरो होती. म्हणजेच जवळपास 46 लाख होती. घराची भिंत पाडताना त्याला ती रक्कम कंटेनरमध्ये सापडली.
एवढी मोठी रक्कम मिळताच टोनो खूप जास्त खूश झाला. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. नोटांचा काही उपयोग होणार नाही हे कळल्यावर त्याच्या आनंदावर विरजण पडले, कारण त्याला बँकेकडून असे उत्तर मिळाले, जे ऐकून त्याला धक्काच बसला. स्पेनच्या व्हॅलेन्सिया येथील बिल्डर टोनो पिनेइरोसोबत घडलेल्या या घटनेची युरोपियन मीडियामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. खरं तर, त्याने राहण्यासाठी विकत घेतलेल्या घराच्या भिंतींमध्ये नोटा सापडल्या. त्या कंटेनरमध्ये बंद केलेल्या होता.
46 लाख 70 हजारांपेक्षा जास्त रक्कम
घरामध्ये आवडीनुसार बदल करून घेत असताना त्याला सहा कंटेनर आणि त्यात भरलेल्या नोटा मिळाल्या. या नोटांची किंमत 47 हजार युरो होती आणि भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत 46 लाख 70 हजारांपेक्षा जास्त आहे. पैसे पाहताच त्याच्या मनात विचार आला की आता या पैशातून इमारतीला नवीन छत करता येईल. पण हे सगळे विचार काही काळ राहिले, कारण या प्रकरणात नवा ट्विस्ट आला.
बँकेने पैसे घेण्यास दिला नकार
टोनोला मिळालेल्या नोटा 20 वर्षांपूर्वी चलनातून बाद झाल्या होत्या. त्या नोटांना त्यामुळे काहीही किंमत नव्हती. त्यामुळे बँकेने ते पैसे घेण्यास नकार दिला. मात्र, जुन्या नोटा लिलावात विकून त्याला 30 हजार युरोची रक्कम मिळाली. बाकीच्या नोटा त्याने सुरक्षितपणे जपून ठेवल्या आहेत. घरात आल्यावर काय सरप्राईझ मिळालं हे पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी त्याने असं केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"