श्वानाच्या पूजेसाठी उभारलं गेलंय हे मंदिर, जाणून घ्या काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 01:40 PM2018-07-20T13:40:16+5:302018-07-20T13:42:06+5:30
श्वान हा सर्वात प्रामाणिक प्राणी मानला जातो. त्यामुळे लोक सहज त्यांच्या घरात या प्राण्याला जागा देतात. पण भारतात असेही काही लोक आहेत जे श्वानांची पूजाही करतात.
नवी दिल्ली : भारतात लोक केवळ देवांनाच नाही तर झाडे, नद्या इतकेच काय तर डोंगरांचीही पूजा करतात. पण असंही एक ठिकाण आहे जिथे श्वानाच्या मूर्तीची पूजा केली जाते. महत्वाची बाब म्हणजे इथे श्वानाचं एक मंदिरही उभारण्यात आलंय. वेगवेगळ्या राज्यातून इथे लोक येऊन श्वानाची पूजाही करतात आणि काही मागणंही मागतात. श्वान हा सर्वात प्रामाणिक प्राणी मानला जातो. त्यामुळे लोक सहज त्यांच्या घरात या प्राण्याला जागा देतात. पण भारतात असेही काही लोक आहेत जे श्वानांची पूजाही करतात. या मंदिरांबाबत वेगवेगळ्या आख्यायिका ऐकायला मिळतात.
कुठे आहे हे श्वानाचं मंदिर
तसे तर तुम्ही आजपर्यंत अनेक वेगवेगळी मंदिरे पाहिली असतील पण आज आम्ही तुम्हाला ज्या मंदिराबाबत सांगणार आहोत ते श्वानाचं मंदिर आहे. छत्तीसगडमध्ये हे अनोखं मंदीर आहे. इथे लोक केवळ श्वानाच्या मूर्तीची पूजाच करत नाही तर काही मागणंही घेऊन येतात. लोकांची धारणा आहे की, इथे काही नवस बोलल्यास तो पूर्ण होतो.
श्वानाने शोधला होता खजाना
अशी मान्यता आहे की, एका व्यक्तीने आपला श्वान सावकाराकडे गहान ठेवला होता. एक दिवस सावकाराच्या घरी चोरी झाली आणि चोरी गेलेला माल चोरांनी एका जागी लपवला होता. हा माल या श्वानाने शोधून काढला होता. सावकाराने खूश होऊन सर्वांच्या वस्तू परत दिल्या.
श्वानाच्या गळ्यावर एक चिठ्ठी बांधून त्याने श्वानाला आपल्या मालकाकडे जाण्यास सोडले. जेव्हा श्वान मालकाकडे पोहोचला तेव्हा त्याला वाटले की, हा सावकाराकडून पळून आलाय. त्यामुळे तो व्यक्ती श्वानाला काठीने मारू लागला. यात श्वानाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या व्यक्तीने त्या श्वानाच्या गळ्यात असलेली चिठ्ठी वाचली. जेव्हा त्या व्यक्तीला सत्यता कळाली तेव्हा त्याला पश्चाताप झाला आणि त्याने श्वानाची समाधी तयार केली. याच जागेवर कुकरमंदिर तयार करण्यात आलं. तेव्हापासूनच लोक इथे पूजा करण्यासाठी येतात.
इथेही आहे श्वानाचं मंदिर
देशाची राजधानी दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबादमध्येही असंच एक श्वानाचं मंदिर आहे. गाझियाबादमधील चिपियाना गावात हे मंदिर असून याची मान्यता अशी आहे की, कुणाला जर श्वानाने चावा घेतला तर या मंदिराजवळ असलेल्या तलावात त्या व्यक्तीला आंघोळ करावी लागते. याने त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही. इथेही वेगवेगळ्या राज्यातून लोक पूजा करण्यासाठी येतात.