परीक्षेसाठी राहा ‘टेन्शन फ्री’
By admin | Published: February 26, 2017 01:56 AM2017-02-26T01:56:33+5:302017-02-26T01:56:33+5:30
दहावीच्या परीक्षेचे गेल्या काही वर्षांत करिअरच्या दृष्टीने महत्त्व वाढले आहे. आता दहावी अथवा बारावीची परीक्षा फक्त विद्यार्थ्यांची राहिली नसून, त्यांच्या पालकांचीदेखील
मुंबई : दहावीच्या परीक्षेचे गेल्या काही वर्षांत करिअरच्या दृष्टीने महत्त्व वाढले आहे. आता दहावी अथवा बारावीची परीक्षा फक्त विद्यार्थ्यांची राहिली नसून, त्यांच्या पालकांचीदेखील असल्याचे वातावरण अनेक घरांमधून दिसून येते, पण या परीक्षांचे टेन्शन घेऊ नका, तर सकारात्मक विचार करून परीक्षेला जा, असा सल्ला विद्यार्थ्यांना आणि पालकांना तज्ज्ञांनी दिला आहे.
दहावीच्या परीक्षेला अवघे दहा दिवस राहिले असल्यामुळे तणाव वाढायला सुरुवात झाली आहे, पण या काळात पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करून स्वत:च ताण कमी करा. शेवटच्या दिवसांत विद्यार्थ्यांनी झालेल्या अभ्यासाचा विचार करावा. अभ्यासातील जो भाग राहिला असेल, त्याचा विचार करून नकारात्मक विचार मनात आणू नये. परीक्षेविषयीच्या शंकांमुळे विद्यार्थी तणावाखाली असतील किंवा कुटुंबातील सदस्य आणि मित्रांमध्ये केवळ परीक्षा, निकाल आणि प्रवेश मिळविण्याच्या क्लिष्ट प्रक्रियेविषयी चर्चा होत असेल, तर विद्यार्थ्यांचा तणाव वाढू शकतो. त्यामुळे हे विषय टाळावेत, असा सल्ला डॉ. संदीप झा यांनी दिला. डॉ. झा यांनी पुढे सांगितले, पोषक आहार घेतल्याने शरीर आरोग्यदायी राहाते. शरीराच्या सर्व क्रिया योग्य पद्धतीने सुरू राहतात. त्यामुळे जेवण न घेणे, चहा, कॉफीचे अतिसेवन टाळावे. परीक्षा उन्हाळ््यात असल्याने विद्यार्थ्यांनी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. जर तुमचा अभ्यास पूर्ण झाला असेल, तर थोडी विश्रांती घ्या. नव्या प्रकरणाचा अभ्यास सुरू करणे हितावह नाही. अभ्यासक्रम सहजरीत्या समजून घेण्यासाठी आणि किचकट माहिती सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तक्ते व आकृत्या आवश्यक असतात. चित्रप्रतिमा लक्षात ठेवणे सोपे असते आणि म्हणून अशा आकृत्या किंवा संक्षिप्त नावे लक्षात ठेवा. नंतर केवळ त्यांच्यावर नजर टाकली, तरी बराच फरक पडेल, असे तज्ज्ञांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अन्य विषयांवरही बोला
बारावीच्या परीक्षा दोन दिवसांमध्ये सुरू होणार आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवसांत अभ्यासाचा ताण घेऊ नका. जितका अभ्यास झाला आहे, त्याची उजळणी करा. सतत अभ्यास करू नका. कुटुंबीयांसोबत बसून अन्य विषयांवर गप्पा मारा. थोडा व्यायाम, प्राणायाम करा. नकारात्मक विचार टाळा.