सुगंध अन् फेसही नसणारा...हा आहे 'स्टील'चा साबण, पण तरीही याचा वापर वाढला, कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 05:17 PM2022-03-28T17:17:48+5:302022-03-28T17:35:03+5:30
आता अजिबात फेस न येणारा, सुगंध नसलेला आणि स्टीलसारखा दिसणारा साबण बाजारात उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे या साबणाचा वापर केल्यास दुर्गंधी निघून जाते आणि घाणही निघून जाते.
आरोग्याच्या (Health) दृष्टिकोनातून स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं जातं. सध्याच्या काळात बाजारात विविध प्रकारचे साबण, लिक्विड सोप, हॅंडवॉश आदी गोष्टी उपलब्ध आहेत. ही उत्पादनं प्रामुख्याने हात स्वच्छ करण्यासाठी वापरतात. बाजारात उपलब्ध असलेला कोणताही साबण (Soap) तुम्ही हात स्वच्छ करण्यासाठी घेतला तर पाण्याशी संपर्क येताच त्याला फेस (Spume) येतो. तसंच त्याचा सुगंधदेखील येतो. आता यात नवीन काय?, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. खरं तर यात नावीन्य काहीच नाही; पण आता अजिबात फेस न येणारा, सुगंध नसलेला आणि स्टीलसारखा दिसणारा साबण बाजारात उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे या साबणाचा वापर केल्यास दुर्गंधी निघून जाते आणि घाणही निघून जाते.
स्टीलच्या तुकड्यासारखा दिसणारा एक साबण आता बाजारात उपलब्ध झाला आहे. स्टेनलेस स्टील साबण (Stainless steel soap) म्हणूनही हा ओळखला जातो. हा साबण सिल्व्हर कलरचा (Silver Colour) आहे. याचा आकार सर्वसामान्य साबणासारखा आहे; पण या साबणाचा वापर केला असता, त्यातून फेस येत नाही पण दुर्गंधी दूर होते. किमतीचा विचार करायचा झाला तर या साबणाच्या दर्जानुसार याची किंमत ठरवण्यात आली आहे. ई-कॉमर्स वेबसाइट्सनी दिलेल्या माहितीनुसार, या साबणाची किंमत २५० ते ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. तुम्ही हा साबण ऑनलाइन (Online) घरपोच मागवू शकता. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयीची वृत्त दिलं आहे.
हा साबण वापरण्याची खास अशी कोणतीही पद्धत नाही. सर्वसामान्य साबणाप्रमाणेच याचा वापर करता येतो. हात धुताना पाण्याच्या संपर्कात हा साबण आला तरी त्याला फेस येत नाही. हा साबण हातावर घासल्यास हाताची घाण, दुर्गंधी दूर होते. कारण सल्फरचे रेणू या साबणाला चिकटतात. त्यामुळे हा साबणही स्वच्छ करणं आवश्यक आहे.
हा साबण प्रामुख्याने घाण स्वच्छ करण्याचं आणि विचित्र वास दूर करण्याचं काम करतो. तुम्ही किचनमध्ये काम करतेवेळी कांदा चिरला किंवा लसूण सोललं तर हात धुवूनही वास कायम राहतो. पण या साबणाचा वापर केल्यास असा उग्र वासही निघून जातो.