डाकू सुल्तानाच्या किल्ल्यातील खजिन्याची आणि त्याच्या दहशतीची खतरनाक कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 04:11 PM2021-08-27T16:11:11+5:302021-08-27T16:13:37+5:30
असं मानलं जातं की, २०व्या शतकाच्या सुरूवातीला उत्तर प्रदेशच्या नजीबाबादपासून ते कोटद्वारपर्यंत सुल्ताना डाकूची भीती होती.
आजही अनेक कुख्यात डाकूंची चर्चा होत असते. एकेकाळी जंगल आणि खोऱ्यांवर डाकू राज्य करायचे. भारतात अनेक डाकू झाले ज्यात वीरप्पनचं नाव सर्वातआधी घेतलं जातं. एक डाकू असाही होता ज्याचं नाव ऐकूनच लोक घाबरत होते. या डाकूचं नाव होतं सुल्ताना. चला जाणून घेऊ या डाकूची कहाणी आणि त्याच्या गावाबाबत....
असं मानलं जातं की, २०व्या शतकाच्या सुरूवातीला उत्तर प्रदेशच्या नजीबाबादपासून ते कोटद्वारपर्यंत सुल्ताना डाकूची भीती होती. सुल्ताना डाकूबाबत सांगितलं जात की, तो जिथे लुटण्यासाठी जात होता तेथील लोकांना तो येणार असल्याची आधीच सूचना देत होता. त्याच्याबाबत असंही सांगितलं जातं की, त्याने कधी गरीबांना लुटलं नाही.
असं सांगितलं जातं की, कोटद्वार-भाबर भागातील प्रसिद्ध जमीनदार उमराव सिंह याच्याकडे सुल्ताना डाकूने आधी सूचना देऊनच डाका टाकला होता. उमराव सिंह यावर नाराज झाला आणि त्याने पोलिसांना माहिती देण्यासाठी आपल्या नोकराकडे चिठ्ठी देऊन पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास सांगितलं. नोकराला रस्त्याच सुल्ताना डाकूचे साथीदार भेटले. ते पोलिसांचे कपडे घालून असल्याने नोकराने त्यांच्याकडे चिठ्ठी दिली. त्यानंतर सुल्ताना डाकू उमराव सिंहच्या घरी पोहोचला आणि त्याच्यावर गोळी झाडली.
असेही म्हणतात की, चारशे वर्षाआधी नजीबाबादमध्ये नवाब नजीबुद्दौलाने एक किल्ला बनवला होता. नंतर या किल्ल्यावर सुल्ताना डाकूने ताबा मिळवला होता. आज हा किल्ला वाईट स्थितीत आहे. असं सांगितलं जातं की, किल्ल्याच्या मधोमध एक तलाव होता. ज्यात सुल्ताना डाकू त्याने लुटलेला खजिना लपवत होता. जेव्हा या लपवलेल्या कथित खजिन्याची माहिती लोकांना मिळाली तेव्हा खोदकाम करण्यात आलं. पण कुणाच्या हाती काही लागलं नाही.
तेच काही लोकांनी सांगितलं की, सुल्ताना डाकूने या किल्ल्याच्या आत एक भुयार तयार केला होता. असे म्हणतात की, जेव्हा त्याला तुरूंगात कैद केलं जातं होतं, तेव्हा याच भुयारातून तो तुरूंगातून फरार होत होता. इतकंच नाही तर पोलीस स्टेशनमधील बंदुकीची चोरी करत होता.
असं सांगितलं जातं की, सुल्ताना डाकूला पकडण्यासाठी १९२३ मध्ये ३०० पोलीस आणि ५० घोडेस्वारांची फौज गोरखपूरपासून ते हरिद्वारपर्यंत छापेमारी करत होती. तेच सुल्ताना डाकूला १४ डिसेंबर १९२३ ला नजीबाबादच्या जंगलात पकडण्यात आलं. त्यानंतर त्याला तुरूंगात डांबण्यात आलं. त्याला ८ जून १९२४ रोजी फाशी देण्यात आली.