अजबच! १०० वर्षांनी योग्य पत्त्यावर पोहोचलं पत्र, उघडून बघताच बसला आश्चर्याचा धक्का, आत होतं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 09:21 AM2023-02-20T09:21:08+5:302023-02-20T09:21:25+5:30
Jara Hatke News: आजच्या झटपट संदेशवहनाच्या काळात एक पत्र तुमच्या घरी आले आणि ते पोहोचायला १०० वर्षे लागली, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल. ही गंमत नाही तर प्रत्यक्षात असं घडलं आहे.
पोष्टातून पाठवलेले एखादे पत्र किंवा मनिऑर्डर पोहोचण्यास उशीर झाल्याचा प्रकार तुमच्यासोबतही घडला असेल. पण हा उशीर आठ दिवस, पंधरा दिवस किंवा फार तर महिनाभराचा असेल. मात्र आजच्या झटपट संदेशवहनाच्या काळात एक पत्र तुमच्या घरी आले आणि ते पोहोचायला १०० वर्षे लागली, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल. ही गंमत नाही तर प्रत्यक्षात असं घडलं आहे. इंग्लंडमधील एका घरामध्ये अचानक एक पत्र पोहोचलंय. हे पत्र १९१६ मध्ये लिहिलेलं होतं. ते आता तब्बल १०० वर्षांनंतर योग्य पत्त्यावर पोहोचलं. १९१६ मध्ये हे पत्र बाथ शहरातून पाठवण्यात आलं होतं. या पत्राला पाहून त्या पत्त्यावर आता राहणाऱ्या लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
या पत्रावर पेनी जॉर्ज व्ही चा स्टॅम्प लागलेला आहे. तो पाहून हे पत्र कदाचित पहिल्या महायुद्धाच्या काळात लिहिलं गेलं असावं, असा अंदाज बांधला जात आहे. थिएटर डायरेक्टर फिनले ग्लेन यांनी याबाबत माध्यमांना सांगितले की, सुरुवातीला मला वाटले की, हे पत्र २०१६ मध्ये लिहिले गेले असावे, कारण त्यावर वर्ष केवळ १६ असं लिहिलेलं होतं. मात्र मी अधिक बारकाईनं पाहिलं तेव्हा त्यावर राणाऐवजी राजाचा स्टॅम्प लागलेला दिसला. तो पाहून मला हे पत्र २०१६ नाही तर १९१६ मध्ये लिहिलेले असल्याचे दिसून आले.
हे पत्र संबंधित पत्त्यावर काही वर्षांपूर्वी पोहोचलं होतं. मात्र त्यामागच्या इतिहासाचा उलगडा करण्यास ग्लेन यांना काही अवधी लागला. त्यानंतर त्यांनी या पत्राबाबत अधिक माहिती मिळावी म्हणून ते लोकल हिस्ट्री ऑर्गनायझेशनला हे पत्र सुपुर्द केले.
लोकल हिस्ट्री मॅगझिन द नॅरो रिव्ह्यूचे संपादक स्टीफन ऑक्सफर्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र कुठल्यातरी काईट मार्शला लिहिण्यात आले होते. त्यांचा विवाह ओसवल्ड मार्श नावाच्या स्टॅम्प डिलरसोबत झाला होता. मार्शा यांची मैत्रिण किस्टाबेल मेनेल यांनी त्यांना हे पत्र लिहिले होते. ती बाथ येथे राहायची. त्यात लिहिले होते की, मला तुझ्या मदतीची गरज आहे. त्या दिवशी मी जे काही केलं, त्यानंतर मला खूप लाज वाटत आहे. मी येथे कडाक्याच्या थंडीत बिकट स्थितीमध्ये आहे.
ऑक्सफर्ड यांच्या मते त्यावेळी हे पत्र कुठल्यातरी पोस्ट ऑफिसमध्ये हरवले होते. मात्र ते दुरुस्तीच्या कामादरम्यान पुन्हा मिळाले. त्यानंतर ते योग्य पत्त्यावर पुन्हा पाठवण्यात आले. जिने हे पत्र लिहिले आहे ती त्यावेळच्या एका श्रीमंत चहाच्या व्यापाऱ्याची मुलगी असल्याचे मानले जात आहे. त्यावेळी अप्पर नॉकवुड आणि क्रिस्टल पॅलेस ही दोन्ही ठिकाणं खूप श्रीमंत होती. तिथे श्रीमंत आणि मध्यमवर्गीय लोक राहायचे. या पत्राचा रंजक इतिहास पाहिल्यावर ग्लेन यांनी हे पत्र ऑर्गनायझेशनला सोपवण्याचा निर्णय घेतला.