बाराव्या वर्षीच ‘प्रोफेसर’ होण्याचा विक्रम; १८व्या वर्षी व्हायचंय डॉक्टरेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 10:10 AM2024-06-29T10:10:03+5:302024-06-29T10:10:42+5:30
सुबोर्नोची आई शाहेदा बारी यांचा ऊर सुबोर्नोच्या कामगिरीने भरून येतो. त्याच्यातील चिकाटी, क्षमता या गुणांमुळे सुबाेर्नो कायमच इतरांपेक्षा वेगळा आहे, याचा त्यांना अभिमान वाटतो
काही करून दाखवायचं असेल तर वय आड येत नाही. कमी वयातही अचाट वाटणाऱ्या गोष्टी करता येतात हे अमेरिकेत राहणाऱ्या सुबोर्नो बारी या मुलाने सिद्ध केलं आहे. न्यूयाॅर्क विद्यापीठातून सुबोर्नो अवघ्या १२ व्या वर्षी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाला. अर्थात हे काहीच नाही. बाराव्या वर्षीच सर्वांत कमी वयाचा ‘प्रोफेसर’ होण्याचा जागतिक विक्रमही त्यानं आपल्या नावे केला आहे. अमेरिकेच्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे.
सुबोर्नोने या वयापर्यंत जी शैक्षणिक कामगिरी केली आहे ती लोकांना अचंबित करणारी आहे. सुबोर्नोने शैक्षणिक प्रगतीत गाठलेला टप्पा हा न्यूयाॅर्क विद्यापीठालाही कौतुकास्पद वाटला आहे. सुबोर्नो बारीचा जन्म २०१२ मध्ये झाला. तो आता १२ वर्षांचा आहे आणि त्याने मालव्हर्न हायस्कूलमधून १२वीचा अभ्यास पूर्ण केला आहे. अमेरिकेतील न्यूयाॅर्कजवळील लायनब्रूक येथे सुबोर्नो राहतो. कमी वयात वेगाने शैक्षणिक टप्पे गाठणाऱ्या सुबोर्नो आयझ्याक याने दोन पुस्तकंही लिहिली आहेत. विविध विद्यापीठांत त्याने व्याख्यानेदेखील दिली आहेत. त्याचा बालपणापासूनचा शैक्षणिक प्रवास रोमहर्षक आहे. १२ व्या वर्षी १२ वी होणारा सुबोर्नो हा अमेरिकेतील पहिला विद्यार्थी ठरला आहे. हे यश मिळवण्यासाठी त्याच्या पालकांनी, शिक्षकांनी आणि मित्रांनी त्याला सतत प्रेरणा दिली. सुबोर्नो ४ वर्षांचा होता तेव्हापासूनच त्याने आपल्या कामगिरीने लोकांना अवाक् करण्यास सुरूवात केली होती. सुबोर्नोने आपल्या कामगिरीने अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचेही लक्ष वेधून घेतले होते.
सुबोर्नोने वयाच्या सातव्या वर्षापासूनच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर व्याख्यानं देण्यास सुरूवात केली. त्याने भारतातील विद्यापीठातदेखील व्याख्यानं दिली होती. सुबोर्नो ९ वर्षांचा होता तेव्हाच हार्वर्ड युनिव्हर्सिर्टीने सुबोर्नोकडे शैक्षणिक क्षेत्रातील समस्या सोडविण्याचे कौशल्य असल्याचे ओळखले होते. त्याच्यात असलेल्या विशेष क्षमतेची दखल घेऊन हार्वर्ड युनिव्हर्सिटीने सुबोर्नोला न्यूसिटीच्या प्रोग्राममध्ये सहभागी करून घेतले होते. शिवाय सुबोर्नो स्टोनी ब्रूक युनिव्हर्सिटीचाही विद्यार्थी आहे. वयाच्या सातव्या वर्षी त्याने ‘द लव्ह - दहशतवादाचा नामनेष नसलेले’ नावाचं पुस्तक लिहिलं होतं. त्याची अभ्यासातली गती, शैक्षणिक प्रगती पाहून त्याला चौथीतून थेट नववीत घेण्यात आले. शाळेने तशी परवानगी दिली होती. नववीतून सुबोर्नोला १२वीत घेतले गेले.
सुबोर्नोला पहिल्यापासून सगळ्या विषयांबद्दल सारखंच कुतुहल आणि आकर्षण वाटतं. कोणताही विषय त्याच्या लेखी कमी महत्त्वाचा नाही. विज्ञान, गणित, इतिहास हे सर्वच विषय त्याच्या आवडीचे अन् प्रत्येक विषयात सुबोर्नो पुढेच असतो. त्याचे रसायनशास्त्राचे शिक्षक प्याट्रिक नोलन सुबोर्नोचं वर्णन ‘एक वेगळी, हुशार आणि अपवादात्मक केस’ या शब्दात करतात. वयाच्या ११व्या वर्षी सुबोर्नो हा टीव्हीवरील बातम्यांच्या हेडलाइनचा विषय झाला होता. कारण त्याने तेव्हा एसएटी अर्थात ‘सॅट’ या परीक्षेमध्ये १५०० चा स्कोअर केला होता. या स्कोअरद्वारे त्याने एक नवीन विक्रम केला होता. जगातील सर्वांत मोठ्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी सॅट ही परीक्षा घेतली जाते. त्यातही त्याने विक्रम केला.
सुबोर्नोची आई शाहेदा बारी यांचा ऊर सुबोर्नोच्या कामगिरीने भरून येतो. त्याच्यातील चिकाटी, क्षमता या गुणांमुळे सुबाेर्नो कायमच इतरांपेक्षा वेगळा आहे, याचा त्यांना अभिमान वाटतो. ‘आपला मुलगा इतर मुलांसारखा नव्हता. तो कायम सर्वांच्या एक पाऊल पुढे असायचा,’ असं सुबोर्नोची आई कौतुकाने त्याच्याबद्दल सांगते. तर त्याचे वडील सुबोर्नो त्याच्या वर्गातील मुलांपेक्षा लहान असला तरी वर्गातील मुलं आणि शिक्षक त्याला कायम सहकार्य करायचे, प्रोत्साहन द्यायचे. ही गोष्ट सुबोर्नोच्या मार्गक्रमणात मोलाची आणि मदतीची ठरली, असं कृतज्ञतापूर्वक सांगतात. सुबोर्नो हा यशानं हुरळून जाणारा मुलगा नाही. एक यश मिळालं की त्याला पुढचं यश खुणावू लागतं. शैक्षणिक क्षेत्रात सुबोर्नो आणखी उत्तुंग कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे.
१८व्या वर्षी व्हायचंय डॉक्टरेट !
सुबोर्नोला सर्वच विषयांत गती तर आहेच, पण त्याला विद्यार्थ्यांना शिकवायलाही खूप आवडतं. विशेष म्हणजे त्याचं शिकवणं विद्यार्थ्यांना आवडतंही. सुबोर्नोला मुंबई विद्यापीठाने भौतिकशास्त्र विषयातील गेस्ट लेक्चरसाठी खास निमंत्रित केलं होतं. गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांतील सुबोर्नोची प्रगती पाहता न्यूयाॅर्क विद्यापीठाने त्याला पुढील शिक्षणासाठी पूर्ण शिष्यवृत्ती दिली आहे. वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत पदवीधर आणि १८व्या वर्षापर्यंत डॉक्टरेट असं लक्ष्य त्याने समोर ठेवलं आहे.