भारीच! अवघ्या 13 व्या वर्षी 'या' मुलाने उभारली तब्बल 100 कोटींची कंपनी; आता देतो 200 जणांना नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 01:20 PM2022-10-06T13:20:31+5:302022-10-06T13:21:50+5:30
Tilak Mehta : ज्या वयात मुले खेळतात, अभ्यास करतात आणि मजा करतात त्या वयात त्याने 200 हून अधिक लोकांना रोजगार दिला आहे.
मुंबईत राहणाऱ्या तिलक मेहताने कमाल केली आहे, ज्याने वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी तब्बल 100 कोटींची कंपनी उभारली. ज्या वयात मुले खेळतात, अभ्यास करतात आणि मजा करतात त्या वयात त्याने 200 हून अधिक लोकांना रोजगार दिला आहे. तिलक मेहताला त्याच्या वडिलांच्या थकव्यातून व्यवसायाची कल्पना सुचली. तिलकचे वडील विशाल मेहता जेव्हा संध्याकाळी ऑफिसमधून यायचे तेव्हा ते खूप थकायचे.
तिलकने याच कारणामुळे कधीच वडिलांना बाहेर जायला किंवा काहीही आणायला सांगितले नाही. यानंतर तिलकला वाटले की बहुतेक लोक अशा समस्येला सामोरे जात असतील. यातूनच व्यवसायाची कल्पना सुचली आणि त्याने कुरियर सेवा सुरू केली. त्यांच्या वडिलांनीही यात मदत केली. यानंतर तिलकची ओळख बँक अधिकारी घनश्याम पारेख यांच्याशी करून दिली.
घनश्याम पारेख यांनी व्यवसायाची कल्पना ऐकून नोकरी सोडली आणि तिलकसोबत व्यवसायात सामील होण्याचा निर्णय घेतला. तिलकने आपल्या कंपनीचे नाव 'पेपर अँड पार्सल्स' ठेवले आणि घनश्याम पारेख यांना कंपनीचे सीईओ बनवले. सुरुवातीला तिलकच्या कंपनीने बुटीक आणि स्टेशनरीच्या दुकानातून छोट्या ऑर्डर घेतल्या. त्यासाठी मुंबईतील डब्बेवाल्यांची मदत घेऊन माल पोहोचवण्यात आला.
लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने तिलकने काम वाढवले. तिलकच्या कंपनीत आज 200 हून अधिक लोक काम करतात आणि त्यांच्याशी सुमारे 300 डब्बेवाले जोडले गेले आहे. तिलकच्या कंपनीची वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपये आहे, जी त्यांना 200 कोटींच्या पुढे पोहोचवायची आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.