एका जिद्दीची कहाणी! 'लंडनच्या आजीबाईंची खानावळ'; वाचून डोळ्यात पाणी येईल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 01:11 PM2020-01-30T13:11:19+5:302020-01-30T13:12:31+5:30
नवऱ्यासोबत जाताना २ मुलींना घेऊन गेल्या. तर बाकीच्या मुलींना नातेवाईकांच्या भरवशावर इथेच सोडून दिलं.
मुंबई - १९५० च्या दशकात घरची हलाखीची परिस्थिती आणि पदरी ५ मुली अन् विधवा म्हणून जीवनात आलेली निराशा अशा संघर्षमय जीवन जगत असलेल्या राधाबाई वनारसे, यवतमाळच्या रस्त्यावर भाजी विकण्याचं काम करत होत्या. अचानक त्यांच्या आयुष्यात इंग्लडहून आलेला व्यक्ती येतो, त्याच्याशी लग्न करुन राधाबाई बोटीने लंडनला जातात. येथून सुरु होतो राधाबाईंच्या आयुष्यातील खडतर प्रवास.
नवऱ्यासोबत जाताना २ मुलींना घेऊन गेल्या. तर बाकीच्या मुलींना नातेवाईकांच्या भरवशावर इथेच सोडून दिलं. लंडनला गेलेल्या राधाबाई यांचं जीवन सुरळीत सुरु असताना थोड्या आजाराच्या निमित्ताने त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. राधाबाईंचा संसार पुन्हा उघड्यावर आला. त्यातच घरातल्यांनी घराबाहेर काढले.
ऐन हिवाळ्याच्या दिवसात घराबाहेर पडलेल्या राधाबाई अनोळख्या या देशामध्ये सोबतीला कोणी आपलं माणूस नाही. बाहेर बर्फ पडत होता, हाताला दोन मुली, नववारी साडी नेसलेली बाई लंडनच्या रस्त्यावर एकटी सुन्न मनस्थितीत बसलेली होती. जीवनात पुढे काय करायचं? कसं जगायचं? मुलींना कसं जगवायचं? अशा अनेक प्रश्नांनी डोक्यात विचारांचे काहूर माजलं होतं.
अशातच एक भला माणूस त्यांच्याजवळ येऊन विचारपूस करतो. इंग्रजी येत नसलेल्या राधाबाई कसाबसा त्याच्याशी संवाद साधतात. यामध्ये तो माणूस तिला विचारतो तुम्हाला काय जमतं? यावर तिने स्वयंपाक असं उत्तर दिल. तो माणूस राधाबाईला घरी घेऊन जातो. घरातील मोकळी जागा देऊन सांगतो स्वयंपाक करा. हळूहळू मराठमोळ्या आजीबाईच्या जेवणाची चव लोकांना येत जाते तसतसं आजीबाई वनारसे खानावळ लंडनमध्ये प्रसिद्ध होऊ लागते.
लंडनमध्ये असणाऱ्या मराठी माणसांच्या जीभेचे चोचले पुरवण्याचं काम आजीबाईच्या खानावळीतून होत असे. शिक्षणासाठी आणि कामासाठी वास्तव्य करणाऱ्या लोकांची खानावळीसाठी गर्दी होते. तिथून पुढचा प्रवास म्हणून आजीबाईंची खानावळ मोठ्या जागेत विस्तारते. अगदी पु.लपासून अत्रेपर्यंत अनेक जण लंडनला गेल्यानंतर आजीबाईंच्या खानावळीत जेवायला जात असे. आजीबाईंची खानावळ नावारुपाला आली. निरक्षर असणाऱ्या आजीबाईंचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत गेला. आजीबाईंचे जेव्हा निधन झालं त्यावेळी लंडनमध्ये त्यांच्या मालकीचे ५ फ्लॅट होते. त्यांच्या अंत्यविधीला राणीचा प्रतिनिधी म्हणून लंडनचे मेयर उपस्थित होते. अशा आजीबाईंची खरी कहानी ऐकून एका गोष्टीचं तात्पर्य लक्षात घ्यायला हवं जीवनात संघर्ष अनेक येतील. पण त्याच जिद्दीने पुढे जाण्याची धमक तुमच्यात असली तर तुमचं आयुष्यात यश नक्की मिळतं