सुपरमार्केटमध्ये १० वर्षांपासून पडून होता मृतदेह, सफाई कर्मचारी गेले आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 01:16 PM2019-07-24T13:16:01+5:302019-07-24T13:21:33+5:30
जर तुम्हाला कुणी सांगितलं की, १० वर्ष एका व्यक्तीचा मृतदेह एका सुपरमार्केटमध्ये पडून होता आणि कुणालाच याची कानोकान खबर नव्हती.
जर तुम्हाला कुणी सांगितलं की, १० वर्ष एका व्यक्तीचा मृतदेह एका सुपरमार्केटमध्ये पडून होता आणि कुणालाच याची कानोकान खबर नव्हती. तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना? पण अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लॅरी एली मुरिलो-मोनकाडा २८ नोव्हेंबर २००९ ला घरातील लोकांवर नाराज असल्याने घरातून निघून गेला होता. त्यावेळी त्याचं वय होतं २५. लॅरी अमेरिकेतील आयोवा स्थित एका सुपरमार्केटमध्ये काम करता होता. त्या दिवसापासून तो बेपत्ता झाला. पोलिसांनी त्याचा खूप शोध घेतला, पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही.
आता या घटनेला १० वर्षे ओलांडली. मात्र त्याच्या आई-वडिलांच्या मनात मुलगा परत येईल याची आस अजूनही कायम होती. पण काही दिवसांपूर्वी असं काही झालं की, सर्वांनाच धक्का बसला. सुपरमार्केटची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या दोन सफाई कर्मचाऱ्यांना स्टोरमध्ये फ्रीजरच्या मागे १८ इंचाच्या गॅपमध्ये एक मृतदेह आढळला.
हा मृतदेह दुसऱ्या-तिसऱ्या कुणाचा नसून तो लॅरीचा आहे. म्हणजे साधारण १० वर्षांनंतर लॅरी सापडला, पण त्याचा मृत्यू झालेला होता. पोलीस अधिकारी ब्रॅंडन डेनियलसन यांनी सांगितले की, 'ज्यावेळी लॅरी बेपत्ता झाला होता, तेव्हा बर्फवृष्टी होत होती. आम्ही त्याचा खूप शोध घेतला, पण आम्हाला काहीच हाती लागलं नाही'.
आश्चर्याची बाब म्हणजे लॅरी ज्या सुपरमार्केटचा कर्मचारी होता, ते सुपरमार्केट २०१६ मध्ये बंद झालंय. अशात काही दिवसांपूर्वी काही कामागार येथील फ्रीजर हटवण्यासाठी गेले असता त्यांना एक कुजलेला मृतदेह आढळला. पोलिसांनुसार, ज्या दिवशी लॅरी गायब झाला होता, त्यादिवशी तो सुपरमार्केटच्या रोश्टरमध्ये नव्हता. अशात रोश्टरमध्ये नाव नसतानाही एखादा कर्मचारी सुपरमार्केटमध्ये गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
काय झालं असेल?
आता पोलिसांकडून चौकशी केली जात असून अनेक अंदाज लावले जात आहे. त्यानुसार, लॅरी स्टोरमध्ये आला असेल. तसेच असही शक्य आहे की, त्यान फ्रीजच्या टॉपवर चढण्याचा प्रयत्न केला असेल, पण घसरून गॅपमध्ये पडला असावा. अशात तो ओरडला असेल तरी सुद्धा मशीनच्या आवाजामुळेही त्याचा आवाज दाबला गेला असावा.