आश्चर्यच! म्हणून या गावात होत नाही चहाची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 11:05 AM2018-11-18T11:05:45+5:302018-11-18T11:37:57+5:30
गाव म्हटला की तिथे एखादं हॉटेल, किमान एखादी चहाची टपरी, दारूचे गुत्ते असतातच. पण महाराष्ट्रात असेही एक गाव आहे जिथे चहा विकला जात नाही.
सिंधुदुर्ग - गाव म्हटला की तिथे एखादं हॉटेल, किमान एखादी चहाची टपरी, दारूचे गुत्ते असतातच. पण कोकणातीलसिंधुदुर्ग जिल्ह्यात असे एक गाव आहे जिथे चहा विकला जात नाही. या गावाचं नाव आहे मातोंड.
कोकणातील इतर गावांप्रमाणेच मातोंड गावही सांस्कृतिकदृष्ट्या परिपूर्ण आहे. विविध जातीजमातींचे लोक गावात गुण्यागोविंदाने राहतात. रवळनाथ, सातेरी आणि घोडेमुख ही गावातील प्रमुख देवस्थाने आहेत. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात चहाची एकही टपरी नाही.
याबाबत गावातील जाणकार गारकरी सांगतात की, शे दीडशेवर्षांपूर्वी इतर गावांप्रमाणेच मातोंडमध्येही चहाची टपरी, हॉटेल होते. विरंगुळ्यासाठी ग्रामस्थ तिथे येत. पण या हॉटेलमध्ये येणारी मंडळी कुठलेही वाद उकरून भांडणं करू लागली. असे वाद विकोपाला जाऊ लागल्याने प्रमुख गावकऱ्यांनी ही बाब गावपंचायत आणि ग्रामदेवतेच्या कानावर घातली. त्यानंतर देवीला कौल लावला गेला. तसेच देवाने दिलेल्या आदेशानुसार गावात चहा विकण्यास बंदी घातली गेली."
आता या घटनेला शेकडो वर्षे उलटून गेली तरी ही चहा विक्री वरील बंदी कायम आहे. आजही जत्रोत्सवासारखे कार्यक्रम वगळता गावात हॉटेल घातले जात नाही. तसेच या गावचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा गाव वसवण्यात आल्यापासून गावात दारुबंदी आहे. त्यामुळे अनेक शतके उलटल्यानंतरही गावात दारुचे गुत्ते आढळत नाहीत.