आश्चर्यच ! शास्त्रज्ञांनी शोधला ऑक्सिजनशिवाय जिवंत राहू शकणारा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 03:07 PM2020-02-27T15:07:13+5:302020-02-27T15:10:08+5:30
Science news : शास्त्रज्ञांनी असा एक विचित्र जीव शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे ज्याला ऑक्सिजनची गरज भासत नाही.
तेल अवीव - हे जग अनेक चमत्कारिक गोष्टींनी भरलेले आहे. येथे अनेक असे जीव वास्तव्य करून आहेत ज्यांच्याविषयी अजूनही मानवाला फारशी माहिती नाही. पृथ्वीतलावरील बहुतांश जीवांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. ऑक्सिजन घेतल्याशिवाय सजीव फार काळ जिवंतर राहू शकत नाही. मात्र शास्त्रज्ञांनी असा एक विचित्र जीव शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे ज्याला ऑक्सिजनची गरज भासत नाही. या जीवाचं वैशिष्ट्य म्हणजे ऑक्सिजनची गरज नसल्याने तो श्वासोच्छवास करत नाही.
इस्राइलमधील तेव अवीव विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या जीवाचा शोध लावला आहे. मायटोकॉन्डियल जीनोम नसलेला हा पहिला बहुकोशीय जीव आहे, त्यामुळे त्याला जीवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासत नाही, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा जीव जेलीफिशसारखा दिसतो. तसेच तो श्वसन करत नाही. शास्त्रज्ञांनी या जीवाचे शास्त्रीय नाव हेन्नीगुया साल्मिनीकोला असे ठेवले आहे. तसेच हा जीव इतर जीवांसाठी धोकादायक नसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
हा जीव नेमका कसा विकसित झाला, याबाबत खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही , असे संशोधक ह्युचन यांनी सांगितल्याचे एएनआयने म्हटले आहे. संशोधन करतान शास्त्रज्ञांनी या जीवाला फ्लोरेसेंट मायक्रोस्कोपच्या खाली पाहिले. मात्र हा जीव कसा विकसित झाला याबाबत अद्याप पुरेशी माहिती मिळू शकलेली नाही.