एक असं बेट जिथे जाण्याची कुणालाच नाही परवानगी, कारण वाचून व्हाल थक्क....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 12:03 PM2019-09-30T12:03:32+5:302019-09-30T12:20:20+5:30
जगभरात अशी अनेक बेटं आहेत, जी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. यातील अनेक बेटांवर लोक फिरायला जातात, पण असेही अनेक बेट आहेत, जिथे जाण्याची कुणालाही परवानगी नाही.
(Image Credit : boredpanda.com)
जगभरात अशी अनेक बेटं आहेत, जी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. यातील अनेक बेटांवर लोक फिरायला जातात, पण असेही अनेक बेट आहेत, जिथे जाण्याची कुणालाही परवानगी नाही. एक असंच बेट आइसलॅंडमध्ये आहे. हे बेट १९६३ मध्ये तयार झालं होतं.
आइसलॅंडच्या दक्षिण तटावर साधारण ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या या छोट्या बेटाचं नाव आहे सुर्तेसी बेट. हे बेट जगातलं सर्वात कमी वय असलेलं बेट मानलं जातं. कारण या बेटाची निर्मिती केवळ ५६ वर्षांआधी झाली आहे.
(Image Credit : surtsey.is)
सुर्तेसी बेटाची निर्मिती पाण्याखाली असलेल्या ज्वालामुखीच्या स्फोटामुळे झाली होती. ज्वालामुखीच्या स्फोटातून बाहेर आलेल्या लाव्हारसामुळे हे बेट तयार झालं. १४ नोव्हेंबर १९६३ ला अधिकृतपणे या बेटाची निर्मिती झाली. नॉर्वेच्या पौराणिक कथांनुसार, या बेटाचं नाव अग्नी देवता सुर्तुरच्या नावावर ठेवण्यात आलं आहे.
(Image Credit : Social Media)
जेव्हा हे बेट तयार झालं होतं, तेव्हा फ्रान्सच्या तीन पत्रकारांची टीम इथे गेली होती. पण काही वेळातच ते तेथून निघून गेले. ते तेथून गेल्यावर बेटावर मोठा स्फोट झाला होता.
(Image Credit : The Surtsey Research Society)
तसे तर या बेटावर वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी आणि जीव राहतात, पण मनुष्याला इथे जाण्याची अजिबात परवानगी नाही. फक्त काही मोजक्याच वैज्ञानिकांना संशोधनासाठी इथे जाण्याची परवानगी आहे आणि तेही येता-जाताना त्यांची चांगल्याप्रकारे तपासणी केली जाते. त्यांना या बेटाहून कोणत्याही प्रकारची वस्तू आणण्याची परवानगीही नाही.
(Image Credit : The Surtsey Research Society)
काही वर्षांपूर्वी या बेटावर टोमॅटोची रोपे उगवू लागली होती. ही रोपे बघून वैज्ञानिकही हैराण झाले होते. पण ही रोपे नंतर तेथून काढण्यात आलीत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या बेटाचा युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश केला आहे.
या बेटाचा वापर आता वैज्ञानिक केवळ संशोधनासाठी करतात. वैज्ञानिक हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, कोणत्याही मानवी प्रभावाशिवाय एक परिस्थितीक तंत्र कसं तयार होतं.