जगातील सर्वात लांब पॅसेंजर ट्रेन पाहून तुम्हाला वाटेल आश्चर्य! जाणून घ्या, खासियत...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 03:27 PM2022-11-01T15:27:00+5:302022-11-01T15:27:37+5:30
Switzerland Runs The Longest Train : ट्रेनमध्ये एकूण सीट्सची संख्या 4550 सांगितली जात आहे. तसेच, ही ट्रेन आल्पस पर्वतरांगांच्या सुंदर टेकड्यांमध्ये धावली आहे.
नवी दिल्ली : स्वित्झर्लंडच्या रॅटियन रेल्वेने विक्रमी 1.9 किलोमीटर लांबीची पॅसेंजर ट्रेन चालवल्याचा दावा केला आहे. ही ट्रेन जगातील सर्वात मोठी पॅसेंजर ट्रेन असल्याचा दावा केला जात आहे. 100 डब्यांची ही ट्रेन एकाच वेळी सात चालक चालवतात. ट्रेनमध्ये एकूण सीट्सची संख्या 4550 सांगितली जात आहे. तसेच, ही ट्रेन आल्पस पर्वतरांगांच्या सुंदर टेकड्यांमध्ये धावली आहे. या माध्यमातून स्वित्झर्लंडला पर्यटक आकर्षित करायचे आहेत.
यापूर्वी 1991 मध्ये बेल्जियममध्ये 1.7 किमी लांबीची ट्रेन धावली होती. तर स्वित्झर्लंडमधील ही ट्रेन युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामील झालेल्या अल्बुला/बर्निना मार्गाने अल्वेन्यू आणि लँडवासरवरून धावणार आहे. तसेच, ही जगातील सर्वात लांब ट्रेन 22 बोगद्यांमधून जाणार आहे. पर्वतांच्यामध्ये बांधलेल्या या वळण मार्गात एकूण 48 पूल आहेत. येथील अल्पाइन वृक्षांमुळे हा ट्रेनचा मार्ग खूपच सुंदर दिसतो. या संपूर्ण प्रवासाला एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो.
स्विस रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्विस रेल्वेच्या 175 व्या वर्धापन दिनानिमित्त रॅटियन रेल्वेचा हा प्रयत्न आहे. या ट्रेनच्या माध्यमातून स्वित्झर्लंडमधील सुंदर दऱ्या जगाला दाखवायच्या आहेत. दरम्यान, कोविड महामारीमुळे रेल्वेच्या कमाईवर परिणाम झाला आहे. तसेच, या ट्रेनच्या माध्यमातून आम्हाला जगातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करायचे आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
जवळपास 2 किमी लांबीची ही ट्रेन धावत असल्याने तिचे फोटो व्हायरल होत आहेत. हे दृश्य पाहण्यासाठी आलप्सच्या सुमारे 25 किमी दरीपर्यंत लोकांची गर्दी झाली होती. दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय रेल्वेने भारतातील सर्वात लांब मालगाडी चालवली होती. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सुपर वासुकी नावाची ही मालगाडी 3.5 किलोमीटर लांब होती. या मालगाडीत एकूण 27 हजार टन वजनाचा माल होता. या मालगाडीला एकूण 295 डबे होते.