...म्हणे ‘महात्मा’ उपाधी टागोरांनी दिली नव्हती!

By Admin | Published: February 16, 2016 03:15 AM2016-02-16T03:15:03+5:302016-02-16T03:15:03+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ‘महात्मा’ ही उपाधी नोबेल पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी दिली असल्याचे शाळा कॉलेजातून शिकवले जाते

... Tagore did not give the title 'Mahatma'! | ...म्हणे ‘महात्मा’ उपाधी टागोरांनी दिली नव्हती!

...म्हणे ‘महात्मा’ उपाधी टागोरांनी दिली नव्हती!

googlenewsNext

अहमदाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ‘महात्मा’ ही उपाधी नोबेल पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी दिली असल्याचे शाळा कॉलेजातून शिकवले जाते; परंतु गुजरात सरकारला मात्र हे मान्य नाही असे दिसते. कारण सौराष्ट्रच्या जेतपूर गावातील अज्ञात पत्रकाराने सर्वप्रथम गांधीजींचा उल्लेख ‘महात्मा’ असा केला होता, असे या सरकारचे म्हणणे आहे.
राजकोट जिल्हा पंचायत शिक्षण समितीने राजकोटसह इतर काही जिल्ह्यांच्या महसूल विभागात तलाठी पदावर नियुक्तीसाठी अलीकडेच एक परीक्षा घेतली होती. या परीक्षेत गांधीजींना महात्मा ही उपाधी कुणी दिली होती? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
ही परीक्षा देणारी एक परीक्षार्थी संध्या मारू हिने या प्रश्नाचे उत्तर रवींद्रनाथ टागोर असे दिले होते; परंतु हे उत्तर चुकीचे ठरवून तिचे गुण कमी करण्यात आले. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असतानाच सौराष्ट्रातील एका पत्रकाराने त्याच्या निनावी पत्रात त्यांचा महात्मा म्हणून गौरव केला होता, असा खुलासा परीक्षा आयोजन समितीतर्फे करण्यात आला. त्याच्या पुष्ट्यर्थ गांधीवादी नारायण देसाई यांच्या पुस्तकाचा हवालाही समितीने दिला.
या गुणकपातीविरोधात संध्या मारू यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आणि वादाला तोंड फुटले. याचिकेत तीन प्रश्नांच्या उत्तराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. अंतरिम उत्तर पत्रिकेत या प्रश्नांची योग्य उत्तरे आहेत; परंतु अंतिम उत्तर पत्रिकेत मात्र चुकीची उत्तरे देण्यात आली असल्याचा याचिकाकर्तीचा दावा आहे.
गांधी यांना महात्मा उपाधी कुणी दिली? या प्रश्नाचे अंतरिम उत्तरपत्रिकेतील उत्तर टागोर असे आहे; परंतु अंतिम उत्तरपत्रिकेत मात्र अज्ञात पत्रकाराचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे देशातील सर्वात लांब नदी कोणती? या प्रश्नाचे उत्तरही गंगाऐवजी ब्रह्मपुत्रा असे देण्यात आले असल्याचे संध्या मारू यांनी लक्षात आणून दिले. विशेष म्हणजे यावर न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला यांनी मागितलेल्या खुलाशातही जिल्हा पंचायतने या अज्ञात पत्रकाराचाच उल्लेख केला. तेव्हा न्यायालयाने थेट जिल्हा पंचायतीचे वकील एच.एस. मनशॉ यांनाच या प्रश्नाला तुमचे उत्तर काय असेल? असा सवाल केला. वकिलांनी आपले उत्तर टागोरच राहील, कारण विद्यार्थ्यांना हेच शिकविले जाते, असे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ फेब्रुवारीला होणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: ... Tagore did not give the title 'Mahatma'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.