Video - कर्ज घेतलं, पण परतफेड करेना; रेस्टॉरंटमध्ये 1000 झुरळं फेकून 'त्यानं' घेतला भयानक बदला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 04:39 PM2021-05-05T16:39:37+5:302021-05-05T17:55:35+5:30
रेस्टॉरंट्समध्ये हजारो झुरळं फेकून काही अज्ञात फरार झाले. घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत न दिल्यामुळे त्रास देण्यासाठी हे कृत्य केले असल्याचं पोलिसांनी म्हटलं
तैवानमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी एका रेस्टॉरंटवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मात्र हा हल्ला बंदूक किंवा इतर कोणत्या गोष्टी वापरून करण्यात आला नव्हता. तर हा हल्ला झुरळांच्या माध्यमातून करण्यात आला. या रेस्टॉरंट्समध्ये एक हजार झुरळं फेकून काही अज्ञात फरार झाले. घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत न दिल्यामुळे त्रास देण्यासाठी हे कृत्य केले असल्याचं पोलिसांनी म्हटलं. पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज जारी केले आहेत. यामध्ये दोन व्यक्ती काळे कपडे परिधान करून रेस्टॉरंटमध्ये आले आणि झुरळं फेकून निघून जात असल्याचं पाहायला मिळत आहे.
पोलीस आयुक्त चेन जिया चांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस्टॉरंटच्या मालकाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका टोळीकडून कर्ज घेतले होते. त्यांनीच हे कृत्य केले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. झुरळं फेकणे हा हिंसक हल्ला असल्याचे समजले जाते आणि त्यासाठी गुन्हेगारांना शिक्षा मिळायला हवी असेही त्यांनी म्हटले आहे. रेस्टोरंटमध्ये फेकण्यात आलेले झुरळं ही लहान आकाराची होती. सीसीटीव्ही फूटजेमध्ये दोन व्यक्ती झुरळं फेकून रेस्टोरंटच्या बाहेर पळाल्याचं पाहायला मिळालं.
Roach attack -- police are investigating two men who reportedly released over 1000 cockroaches in a restaurant where the police chiefs of Taipei and New Taipei cities were attending a dinner party last night.
— Amber Wang (@ambermywang) May 4, 2021
(video source: Taipei police department) pic.twitter.com/r2yMtf4JJD
झुरळ हल्ल्यानंतर रेस्टॉरंट पूर्णपणे स्टेरलाइज करण्यात आले. या हल्ल्याप्रकरणी चार पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्याशी त्यांचा संबंध असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेस्टॉरंटच्या मालकाने कर्ज म्हणून घेतलेली रक्कम न दिल्याने हा हल्ला झाल्याचे म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. रेस्टॉरंटमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.