VIDEO: या लग्नाचा न्याराच थाट; स्कूबा डायव्हिंग करत समुद्रात ६० फूट खोल बांधली लगीनगाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 12:29 PM2021-02-02T12:29:03+5:302021-02-02T12:29:30+5:30
पाण्याखाली संपन्न झाला विवाह सोहळा; भन्नाट लग्नाची सर्वत्र चर्चा
चेन्नई: आपलं लग्न अविस्मरणीय व्हावं, असं सगळ्यांनाच वाटतं. त्यामुळे लग्नात काहीतरी हटके करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तमिळनाडूत राहणाऱ्या व्ही. चिन्नादुराई आणि एस. श्वेता यांनादेखील असंच वाटायचं. त्यामुळेच त्यांनी लग्न करण्यासाठी एक भन्नाट प्लान केला. त्यांच्या या हटके लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या लग्नाचा व्हिडीओ अगदी भन्नाट आहे.
चार वर्षांच्या चिमुरडीनं शोधला नामशेष झालेल्या डायनासोरच्या पायाचा ठसा
चिन्नादुराई आणि श्वेता यांनी तमिळनाडूतल्या नीलकंरई येथील समुद्रात १ फेब्रुवारीला लग्न केलं. दोघेही अगदी व्यवस्थित तयार होऊन, नटूनथटून समुद्र किनारी आले होते. मुहूर्त जवळ येताच दोघांनी समुद्रात उडी घेतली. पाण्यात ६० फूट खाली गेले. दोघांनी एकमेकांना हार घातले. चिन्नादुराई आणि श्वेता पेशानं सॉफ्टवेअर इंजिनीयर आहेत. चिन्नादुरई प्रोफेशनल स्कूबा डायव्हर आहेत. तर श्वेता गेल्या काही महिन्यांपासून स्कूबा डायव्हिंग शिकत आहेत. लग्नाच्या वेळी दोघांनी पारंपारिक पोशाख परिधान केले होते.
Under water marriage at the depth of 60 ft off
— sanjay (@sansub12) February 2, 2021
Chennai's shoreline near Neelagarai On 1st Feb 2021. pic.twitter.com/AxLtr6WzVx
आधी नकार, मग होकार
श्वेता कोईमंतूरच्या रहिवासी आहेत. स्कुबा डायव्हिंग करून लग्न बंधनात अडकण्याची संकल्पना चिन्नादुराई यांची होती. सुरुवातीला श्वेता यांना ही कल्पना फारशी आवडली नाही. त्या घाबरल्या होत्या. त्यामुळे अशा प्रकारे लग्न करण्यास त्यांचा नकार होता. मात्र चिन्नादुराई यांनी त्यांची समजूत काढली. यानंतर त्या तयार झाल्या. तिरुवन्नमलईमध्ये राहणाऱ्या चिन्नादुराई यांना लहानपणापासूनच जलतरणाची आवड आहे. ते १२ वर्षांपासून स्कुबा डायव्हिंग करत आहेत.
बापरे! मासेमारी करणं चांगलंच अंगाशी आलं, डॉक्टरांनी घश्यातून काढला ७ इंचाचा मासा, पाहा व्हिडीओ
४५ मिनिटांत विवाह संपन्न
चिन्नादुराई आणि श्वेता यांचा विवाह सोहळा ४५ मिनिटांत संपन्न झाला. चिन्नादुराई यांनी पाण्याखाली श्वेता यांना पुष्पगुच्छ देऊन प्रपोज केलं. त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. समुद्राला साक्षी ठेवून एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं. यानंतर दोघांनी सात फेरेदेखील घेतले.