अरे देवा! ...म्हणून 'त्याने' आपल्या हातावरच काढला बारकोडचा टॅटू; कारण ऐकून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 11:30 AM2022-12-02T11:30:15+5:302022-12-02T11:39:47+5:30
तुम्ही कधी बारकोड टॅटू पाहिला आहे का? तुम्हाला हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल, कारण प्रत्यक्षात बारकोड हा उत्पादन किंवा किंमत स्कॅन करण्यासाठी असतो.
टॅटू काढायला अनेकांना आवडतं. सध्या हटके, भन्नाट टॅटूची क्रेझ पाहायला मिळते. काही लोक त्यांच्यासाठी सर्वात जास्त अर्थ असलेल्या गोष्टींकडे खूप आकर्षित होतात, मग ते एखादं चित्र, लोगो किंवा छानसं वाक्य असो. त्याचाच टॅटू काढतात. पण तुम्ही कधी बारकोड टॅटू पाहिला आहे का? तुम्हाला हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, कारण प्रत्यक्षात बारकोड हा उत्पादन किंवा किंमत स्कॅन करण्यासाठी असतो. कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर बारकोड टॅटू बनवण्याची बाब आश्चर्यकारक आहे. पण अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे.
स्मार्टफोनचा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे, कॅश पेमेंट आता ट्रेंडच्या बाहेर आहे. लोक रोख रक्कम देण्याऐवजी ऑनलाईन पेमेंट करण्यास प्राधान्य देतात. बहुतेक लोक कार्ड किंवा ट्रान्झॅक्शन अॅप्सद्वारे पैसे देतात, ज्यांना सामान्यतः भारतात UPI पेमेंट म्हणून ओळखले जाते. तुम्ही तुमच्या फोनवर कोड स्कॅन करा आणि अॅपद्वारे पैसे द्या. पण एका घटनेने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. तैवानमधील एका व्यक्तीने असा धक्कादायक प्रकार केला, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही.
ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी आपल्या हातावर बारकोड टॅटू केला आहे. कारण ही व्यक्ती खूप आळशी असून प्रत्येक वेळी फोन काढण्यास कंटाळा येतो. म्हणून यापासून सुटका करून घेण्यासाठी त्याने हा टॅटू एकदाच कायमचा काढून घेतला आहे. तैवानमध्य़े ही घटना घडली आहे. ही व्यक्ती प्रत्येक वेळी एखादी गोष्ट घेतल्यानंतर पैसे देण्यासाठी आपला फोन काढून थकली होती, त्यामुळे त्याने एक विचित्र उपाय शोधून काढला.
व्यक्तीने आपल्या हातावर पेमेंट बारकोडचा टॅटू काढला आहे आणि आता जेव्हा जेव्हा त्याला पेमेंट करायचे असते तेव्हा तो फक्त हात दाखवतो. या व्यक्तीची ओळख उघड करण्यात आली नाही, मात्र आता तो तैवानमध्ये खूपच लोकप्रिय झाला आहे. सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल झाला आहे. टॅटू बनवण्याचा खूप दिवसांपासून विचार करत होता. तेव्हाच ही अनोखी कल्पना सुचली असं त्याने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.