कोंबड्याची अपहरण करून हत्या; पोलिसाची नोकरी गेली, अपहरणकर्ता आणि खुन्याचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 05:14 PM2022-05-04T17:14:48+5:302022-05-04T17:17:14+5:30
एका कोंबड्यामुळे संपूर्ण पोलीस विभाग लागला कामाला; सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला धक्कादायक प्रकार
गाय, म्हशी हरवल्यानंतर त्यांच्या शोधासाठी पोलिसांची भटकंती, अशा स्वरुपाच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. आपल्याकडे अशा घटना अनेकदा घडतात. मात्र अमेरिकेत घडलेली एक घटना चक्रावून टाकणारी आहे. मिसिसिपीतल्या एका टॅटू पार्लरमधून एक कोंबडा गायब झाला. ४ दिवसांनंतर त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्याची नोकरी गेली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे.
जगभरात रोज अनेक कोंबड्यांचा बळी जातो. मात्र मिसिसिपीतल्या ओशियन स्प्रिंग्समध्ये असलेल्या कोंबड्याची गोष्ट वेगळी आहे. त्याच्या अपहरण आणि मृत्यूमुळे पोलीस अडचणीत आले आहेत. ओशियन स्प्रिंग्समध्ये असलेल्या एका टॅटू पार्लरचा मॅस्कॉट म्हणून एक कोंबडा ठेवण्यात आला होता. कार्ल ज्युनियर असं त्याचं नामकरण करण्यात आलं होतं. गेल्याच आठवड्यात कार्ल ज्युनियर बेपत्ता झाला. मालकानं पोलीस तक्रार दाखल केल्यावर त्याचा शोध सुरू झाला.
ओशन स्प्रिंग्समध्ये असलेल्या ट्विस्टेड अँकर टॅटूचा मॅस्कॉट म्हणून कार्ल ज्युनियर दुकानात असायचा. त्याचा बहुतांश दिवस टॅटू पार्लरच्या आसपास जायचा. २६ एप्रिलला तो अचानक गायब झाला. शोधाशोध करूनही कार्ल ज्युनियर न सापडल्यानं पार्लर चालवणाऱ्या जॅक्सन यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून कार्ल ज्युनियरचं अपहरण झाल्याचं समजलं.
कार्लला काही जण पळवून नेत असल्याचं फुटेजमध्ये दिसलं. या टोळीत सगळे पुरुष होते. केवळ एक महिला होती. ती महिला पोलीस असल्याचा संशय होता. पोलिसांनी तिला अटक केली. तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. अपहरणाच्या ४ दिवसांनंतर कार्लचा मृतदेह मिसिसिपीजवळ बिलोक्सीमध्ये आढळून आला.