वैयक्तिक आयुष्य निरर्थक बनतंय; आपणच ‘आपला मृत्यू’ घडवण्याचा ट्रेण्ड! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 10:12 AM2023-02-20T10:12:00+5:302023-02-20T10:12:17+5:30

एके दिवशी तिच्याच स्मार्टफोनवर तिला दिसलं, दिवसाचा किती वेळ ती स्मार्टफोनवर घालवते ते... रोज किमान सहा ते सात तास ती सोशल मीडियावर असायची. ते पाहून तिलाही मोठा धक्का बसला.

Teenager 17-year-old Logan Lane, Leading the Smartphone Liberation Movement | वैयक्तिक आयुष्य निरर्थक बनतंय; आपणच ‘आपला मृत्यू’ घडवण्याचा ट्रेण्ड! 

वैयक्तिक आयुष्य निरर्थक बनतंय; आपणच ‘आपला मृत्यू’ घडवण्याचा ट्रेण्ड! 

googlenewsNext

सार्वजनिकरीत्या आपण स्वत:हूनच ‘आपला मृत्यू’ घडवून आणणं म्हणजेच ‘सोशल डेथ’ ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. ‘सोशल डेथ’ ही संकल्पना सध्या अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांमध्ये झपाट्याने रुढ होऊ पाहते आहे. काय ही संकल्पना? ‘सोशल डेथ’ म्हणजे आपली सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स बंद करून त्यापासून दूर राहणं आणि सोशल मीडियाशी आपला संबंध कायमचा तोडणं. ज्या सोशल मीडियानं जगभरातल्या तरुणाईला अक्षरश: वेड लावलं आहे, ज्या सोशल मीडियापासून तरुणाई एक क्षणही दूर राहू शकत नाही, त्याच सोशल मीडियाला कायमचं बाय करण्याचा ट्रेण्ड सध्या जगभरात सुरू झाला आहे. आपलं वैयक्तिक आयुष्य त्यामुळे निरर्थक बनतंय हे लक्षात आल्यामुळे तरुणाईनं सोशल मीडियापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. 

यासंदर्भात एका तरुण मुलीची कहाणी लोकांना सोशल मीडियापासून परावृत्त होण्यासाठी प्रेरणा देते आहे. अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरातील ब्रूकलिन परिसरात राहणाऱ्या या १७ वर्षीय तरुण मुलीचं नाव आहे लोगन लेन. वयाच्या अकराव्या वर्षी पहिल्यांदा तिच्या हातात स्मार्टफोन आला आणि झटक्यात तिचं आयुष्य बदललं. फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, टिकटॉक, स्नॅपचॅट, टेलिग्राम, यूट्यूब... यासारख्या  व्यासपीठांवर ती इतकी व्यस्त झाली की, आपण किती वेळ त्यावर घालवतोय, याचंही भान तिला राहिलं नाही. तिचा अभ्यास जवळपास बंद झाला, मैदानावर खेळायला जाणं, व्यायाम करणं, मित्र-मैत्रिणींशी प्रत्यक्ष भेटणं, बोलणं, गप्पा मारणं... सारंच कमी झालं आणि एका वेगळ्याच आभासी विश्वात ती रमली. 

एके दिवशी तिच्याच स्मार्टफोनवर तिला दिसलं, दिवसाचा किती वेळ ती स्मार्टफोनवर घालवते ते... रोज किमान सहा ते सात तास ती सोशल मीडियावर असायची. ते पाहून तिलाही मोठा धक्का बसला. इतका वेळ आपण स्मार्टफोनवर टाइमपास करतो? बरं, या काळात आपण खरोखरच काय केलं, तर तेही आपल्याला सांगता येत नाही. अक्षरश: काहीही नाही. त्याच दिवशी लोगननं ठरवलं, या बोगस स्मार्टफोनला आपल्या आयुष्याचा ताबा घेऊ द्यायचा नाही. तिनं आपला स्मार्टफोन घेतला आणि आपल्या आई-वडिलांच्या रुममधील ड्रॉवरमध्ये ठेवून दिला. त्याऐवजी साधा, विना इंटरनेटचा, ज्यावरून फक्त कॉल करता येईल आणि कॉल घेता येईल, असा फोन वापरायला सुरुवात केली. तिची ही कृती पाहून लोगनचे वडीलही हसले. त्यांना वाटलं, काही तासांत, फार तर एक-दोन दिवसात लोगन परत येईल आणि आपला स्मार्टफोन काढून परत तो वापरायला लागेल... पण तसं घडलं नाही.

लोगननं खरंच मनापासून स्मार्टफोन सोडला होता. याचा अर्थ ती आता इंटरनेट, इतरांशी ‘कनेक्ट’ राहणं या गोष्टी करतच नाही असं नाही, पण त्यासाठी ती आता डेस्कटॉपचा वापर करते. लोगन आता ‘ल्युडिटे क्लब’शीही जॉइन झाली आहे. ज्यांनी ‘सोशल डेथ’ स्वीकारली आहे, ते लोक मुख्यत्वे या ‘ल्युडिटे क्लब’शी संलग्न आहेत. अमेरिकेतील बऱ्याच शहरांमध्ये असे छोटे-छोटे ‘ल्युडिटे क्लब’ आहेत. यात साधारणपणे चार ते १५ तरुण-तरुणींचा समावेश असतो. स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही यासारख्या गोष्टींशी जवळपास घटस्फोट घेतलेल्या तरुणाईचा हा गट ठरवून आठवड्यातून एक-दोनदा प्रत्यक्ष भेटतो, गप्पा मारतो, चर्चा करतो. मिळून काही तरी ॲक्टिव्हिटी ते करतात. पुस्तकांचं वाचन करतात, सामाजिक प्रश्नांवर आपापली मतं मांडतात, फिरायला जातात.

लोगन सांगते, ‘जेव्हा मी स्मार्टफोन सोडायचा निर्णय घेतला, माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. सुरुवातीला मला त्रास झाला, सतत स्मार्टफोन वापरत असल्यानं माझ्या हाताची बोटंही सरळ होत नव्हती. पण नंतर जणू काही एखाद्या मोठ्या साखळदंडातून मुक्त झाल्यासारखं मला वाटलं. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची माझी दृष्टीच बदलून गेली आणि मी वास्तव जगात आले. यावेळी मला कळलं, तरुणाई स्मार्टफोनच्या नादानं किती वेडी झाली आहे. इतकी वर्ष मीही त्यातलीच एक होते...’लोगनला तिच्यासारखीच आणखी एक मैत्रीण 
मिळाली. तिनंही ‘सोशल डेथ’ स्वीकारली होती. या दोघींनी मिळून तरुणाईला स्मार्टफोनच्या कचाट्यातून बाहेर काढायला सुरुवात केली आहे. त्याला आता चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

स्मार्टफोनच्या कचाट्यातून बाहेर! 
स्मार्टफोन मुक्ती चळवळीत भाग घेतल्यानंतर लोगननं प्रथम आपल्याच मित्र-मैत्रिणींना स्मार्टफोनच्या कचाट्यातून  बाहेर काढलं. त्यामुळे त्यांनीही ‘सोशल डेथ’ स्वीकारली आणि लोगनच्या बरोबरीनं तेही आता काम करत आहेत. आपल्यातल्या आंतरिक शक्तीची ओळख त्यांना होते आहे. ड्रॉइंग-पेंटिंगपासून ते वेगवेगळ्या खेळांपर्यंत आपली आवड जोपासायला त्यांनी सुरुवात केली आहे.

 

Web Title: Teenager 17-year-old Logan Lane, Leading the Smartphone Liberation Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.